शासनाने पुढाकार घेतला आता जनतेने पुढे येण्याची गरज : जि.प. माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम
- जिंजगाव येथे पार पडली शासकीय योजनांची जत्रा
- महाराजस्व अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड : अतिदुर्गम व आदिवासीबहुल म्हणून भामरागड तालुक्याची ओळख आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही आजही या तालुक्यात कल्याणकारी योजना राबविण्यासाठी शासनाला पुढाकार घ्यावा लागत आहे. महाराजस्व अभियानातून शासन आपल्या दारी आले असून आता विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जनतेने पुढे येण्याची गरज असल्याचे मत जि.प. माजी अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री आत्राम यांनी मांडले.
भामरागड तालुक्यातील जिंजगाव येथे तहसील कार्यालय मार्फत २० एप्रिल रोजी मुख्यमंत्री शासकीय योजना गतिमान अंमलबजावणी अभियान अंतर्गत शासकीय योजनांची जत्रा, महाराजस्व अभियान कार्यक्रमच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनमोल कांबळे, प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी स्वप्नील मगदुम, सामाजिक कार्यकर्ते तथा जिंजगावचे वनहक्क समिती अध्यक्ष, सीताराम मडावी, कृषी अधिकारी अमोल नेटके, तालुका आरोग्य अधिकारी भूषण चौधरी, नायब तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, वैद्यकीय अधीक्षक सचिन विभूते, राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येर्रावार, सरपंच शारदा कोरेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश मारगोनवार, पौर्णिमा इष्टाम, जि.प. माजी सभापती इंदरशहा मडावी, रामशाह मडावी, उपसरपंच अशोक तलांडे तसेच एचलीचे सरपंच कमला कुरसाम, जेष्ठ शिक्षक रतन दुर्गे, बाबुराव तोर्रेम, विविध बँकेचे शाखा व्यवस्थापक आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आपल्या आदिवासी बांधवासाठी राबविण्यात येतात, मात्र अजूनही बरेच योजनांची माहिती आपल्याला नाही. या माध्यमातून कल्याणकारी योजनांची माहिती जाणून घेऊन त्या योजनांचा लाभ घेतल्यास भविष्यात नक्कीच याचा मोठा फायदा होणार आहे. या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी स्वतःचे कागदपत्र अपडेट असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुशिक्षित युवा वर्गाने पुढाकार घ्यावा, असे आवाहनही भाग्यश्री आत्राम यांनी केले. विशेष म्हणजे आपला जिल्हा आदिवासीबहुल असल्याने याठिकाणी जमिनीचे पट्टे सर्वात महत्वाचा विषय आहे. मात्र, राजस्व अभियानात वनविभागाचा स्टॉल नसल्याचे खंत त्यांनी व्यक्त केले.
जिंजगाव येथील राजस्व अभियानाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे अध्यक्ष अनमोल कांबळे यांनी केले. प्रस्ताविकेतून त्यांनी विविध योजनांची माहिती देतानाच गेल्या १५ दिवसांपासुन नागरिकांसाठी तयार केलेले विविध दाखले व प्रमाणपत्राची माहिती दिले. या अभियानात विविध विभागाचे स्टॉल लावून माहिती देण्यात आली. तर अभियानात गोरनुर, चिचोडा, बोरिया, पडतमपल्ली, येचली, पल्ली, जोगनवही, रेला, बामनपल्ली, दुब्बागुडम, इरकडुंमे, कसनसूर, मन्नेराजाराम, मडवेली, मोकेला, सिंगणपल्ली येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते गरजू आणि लाभार्थ्यांना विविध दाखले, प्रमाणपत्र आणि योजनेचा लाभ देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसोबतच इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli