महत्वाच्या बातम्या

 गांधीजींच्या धोरणात्मक कार्यक्रमानुसार जिल्ह्याची वाटचाल : खासदार रामदास तडस


- सामाजिक अधिकारिता शिबिरात ४७० दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा (देवळी) : भारत सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालयाच्या वतीने वर्धा जिल्ह्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्याचे वाटप करून दिलासा दिला जात आहे. याचाच एक भाग म्हणून देवळीतील शिबीरात दिव्यांग लाभार्थ्यांना लाभ दिला जात आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या धोरणात्मक कार्यक्रमानुसार समाजातील गरजू लाभार्थ्यांना मदत करण्याचे धोरण अंगिकारून वर्धा जिल्ह्याची वाटचाल केली जात असल्याचे विचार खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले. देवळी तालुक्यातील ४७० दिव्यांग लाभार्थ्यांना साहित्य वाटप शिबिराचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

स्थानिक इनडोअर स्टेडियम येथे आयोजित शिबिरात प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रसाद कुलकर्णी यांची उपस्थिती होती. अतिथी म्हणून प्रभारी तहसीलदार दत्ता जाधव, प.स. गटविकास अधिकारी डॉ. महेश बेहेकर, देवळी पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ कावळे, पुलगाव पालीकेचे मुख्याधिकारी विजयकुमार आश्रमा तसेच माजी न.प. उपाध्यक्ष प्रा. नरेंद्र मदनकर यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना समाज कल्याण अधिकारी कुलकर्णी यांनी शासनाची भूमिका विषद करून दिव्यांगांचे परावलंबित्व दूर करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे सांगितले.

सर्वप्रथम अतिथींच्या हस्ते वैराग्य मूर्ती गाडगे बाबा तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला हारार्पण केले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमांची सुरवात करण्यात आली. यावेळी अतिथींच्या हस्ते उपस्थित लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, बॅटरी ऑपरेटेड ऑटोमॅटिक तीन चाकी वाहन, फोल्डिंग चेअर, व्हील चेअर, कृत्रिम अवयव, कर्ण बधिरांसाठी कानातील मशीन तसेच दिव्यांग काठी चे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे नियोजन पंचायत विस्तार अधिकारी प्रमोद बिडवाईक यांनी केले. तसेच प्रास्ताविक बिडीओ डॉ. बेहेकर यांनी केले. संचालन विजय पचारे यांनी केले. यशस्वीतेसाठी कृषी विस्तार अधिकारी हेमंत टिपले, पस विस्तार अधिकारी ढोणे, ग्रामसेवक संघटनेचे जी.बी. गवई, गजानन शिदोडकर, प्रशांत रामटेके, नितेश डोफे, देवेंद्र केवटे तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला नंदू वैद्य, जब्बार तंवर, रवी कारोटकर, विपीन पिसे, उमेश कामडी, सौरभ कडू, अमोद क्षीरसागर तसेच तालुक्यातील दिव्यांग बांधवांची उपस्थिती होती.

भारत सरकारच्या सामाजिक न्याय अधिकारिता मंत्रालय, एलमीको व जिल्हा प्रशासन, समाजकल्याण च्या वतीने सामाजिक अधिकरिता शिबीर केंद्रशासनाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग व्यक्तीकरिता निःशुल्क सहाय्यक उपकरण शिबीर आर्वी तालुक्याकरिता २४ जानेवारी २०२४ ला पंचायत समिती आर्वी येथे ४५४ दिव्यागांना, आष्टी तालुक्याकरिता २५ जानेवारी २०२४ ला श्रध्दा मंगलम पेट अहमदपुर आष्टी येथे ३७२ दिव्यांगाना, कारंता तालुक्याकरिता १२ फेब्रुवारी २०२४ ला पंचायत समिती कारंजा येथे ३६४ दिव्यांगांना, हिंगणघाट तालुक्याकरिता १३ फेब्रुवारी २०२४ ला पंचायत समिती सभागृह हिंगणघाट येथे ३५३ दिव्यांगांना, समुद्रपुर तालुक्याकरिता १४ फेब्रुवारी २०२४ ला पंचायत समिती सभागृह समुद्रपुर येथे ३६० दिव्यांगांना, सेलु तालुक्याकरिता १५ फेब्रुवारी २४२४ ला पंचायत समिती सभागृह सेलु येथे २७९ दिव्यांगांना मोफत साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.





  Print






News - Wardha




Related Photos