महत्वाच्या बातम्या

 हरभऱ्यावरील पाने कुरतडणाऱ्या कटवर्म किडीचे व्यवस्थापन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : हरभरा पिकावर शेंडे, पाने व रोप कुरतडणारी अळी (कट कर्म) या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. या किडीची ओळख, नुकसानीचा प्रकार व व्यवस्थापन शेतकऱ्यांनी  या प्रमाणे आहे.

कटवर्म बहुभक्षीय किड असून या किडीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने उशिरा पेरणी केलेल्या पिकावर होतो. मादी पतंग सुरुवातीला पिकाच्या व तणाच्या पानांवर तसेच कोवळ्या शेंडयांवर एक एक करून किंवा समुहाने ३०० ते ४५० अंडी घालते. अळीची लांबी ०.२ ते १.५ इंच असते या अळीचा रंग हा भुरकट हिरवा, काळपट किंवा करडा असतो. या अळीच्या शरीरावर करडया रंगाचा पटटा शरीराच्या दोन्ही बाजुने असतो. शेतामधे पाने, शेंडे कुरतडलेल्या अवस्थेत दिसुन येतात, मात्र अळी ही झाडाच्या बुंध्याला मातीमध्ये लपून बसते व मुख्यत्वे रात्री पिकावर येऊन पाने व शेंडे कुरतडते. प्रादुर्भाव जास्त असल्यास दिवसा देखील अळी पिकावर आढळून येते. अळीला स्पर्श केल्यास ती शरीराचा C आकार करतांना दिसुन येते. पिकाच्या सर्व अवस्थामध्ये या अळीचा प्रादुर्भाव होवू शकतो. किड रोप अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास रोप कुरतडते व नंतरच्या अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पाने व शेंडे कुरतडते. पूर्ण वाढ झालेली अळी ही जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.

व्यवस्थापन -

शेतामधे किंवा बांधावर कचऱ्याचे ढीग तसेच तण राहणार नाही असे नियोजन करावे. प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतात. या अळीचा प्रादुर्भाव लष्करी अळीप्रमाणे एकाच वेळी आढळून येतो म्हणून शेतातील पिकामध्ये मादी पतंगाने अंडी घालू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १ हजार ५०० पीपीएम २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव २ अळया प्रति मिटर ओळ अशी आर्थिक नुकसानीची पातळी आढळून आल्यास क्लोरपायरीफॉस २० टक्के ईसी५० मिली किंवा क्लोरॅट्रनिप्रोल १८.५ टक्के ३.० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आवश्यकता भासल्यास १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.





  Print






News - Nagpur




Related Photos