क्रिकेट वर्ल्डकप २०१९ : आज ठरणार विश्वविजेता


वृत्तसंस्था / लंडन :  २०१९ च्या वर्ल्डकप अंतिम फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड या आतापर्यंत विश्वविजेतेपदापासून दूर राहिलेल्या देशांनी धडक मारल्यामुळे एक नवा विश्वविजेता उदयास येणार आहे. क्रिकेटजगताला आज, रविवारी नवा विश्वविजेता लाभणार आहे. लॉर्ड्स मैदानावर आज दुपारी ३ पासून ही लढत रंगणार आहे. 
इंग्लंडच्या फुटबॉल संघाने सन १९६६ मध्ये वर्ल्डकप जिंकल्यानंतर इंग्लंडला पुन्हा फुटबॉल वर्ल्डकप विजेतेपदाचा आनंद साजरा करता आलेला नाही, तर इंग्लंडच्या महिला फुटबॉल संघालाही यंदा वर्ल्डकपमध्ये उपांत्य फेरीतच पराभव पत्करावा लागला. त्यामुळे साहजिकच साऱ्यांच्या नजरा क्रिकेट कर्णधार इऑन मॉर्गनकडे आहेत. इंग्लंडसमोर आव्हान असेल ते न्यूझीलंडचे. भारतासारख्या संभाव्य विजेत्या संघाला उपांत्य फेरीत पराभूत केल्यानंतर न्यूझीलंडचा संघ अंतिम फेरीत पोहोचला आहे. त्यामुळे वर्ल्डकपमधील पहिल्या चार संघांत चौथ्या स्थानावर असतानाही न्यूझीलंडला कमी लेखता येणार नाही. 
इंग्लंडकडे जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय, जो रूट, बेन स्टोक्स असे फलंदाज तर जोफ्रा आर्चर, ख्रिस वोक्ससारखे भेदक गोलंदाज आहेत. न्यूझीलंडकडे केन विल्यमसन, मार्टिन गप्टिल, रॉस टेलर असे फलंदाज आहेत पण त्यांची मदार मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेन्ट बोल्ट अशा गोलंदाजांवर प्रामुख्याने असेल. 
सामने : ९ 

इंग्लंडचे विजय : ४ 

न्यूझीलंडचे विजय : ५ 

इंग्लंड ३ वेळा उपविजेता 

न्यूझीलंड एकदा उपविजेता   Print


News - World | Posted : 2019-07-14


Related Photos