राज्य राखीव पोलिस बलाचा सहाय्यक फौजदार पाचशे रूपयांसाठी अडकला, एसीबीने केली कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया :
राज्य राखीव पोलिस बलाच्या जवानांकडून ५०० रूपये लाच स्वीकारल्याप्रकरणी सहाय्यक फौजदारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
प्रभाकर अनंत अडांगळे सहाय्यक फौजदार राज्य राखीव पोलिस बल गट क्र १ पुणे असे लाचखोराचे नाव आहे. तक्रारदार याच तुकडीमध्ये शिपाई पदावर कार्यरत आहे. तक्रारदारासह बी कंपनीतील ४० जवानांची नियुक्ती नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यात लागली. यामुळे २२ जून पासून ते पोलिस मुख्यालय गोंदिया येथे कर्तव्यावर उपस्थित झाले. कर्तव्यावर जाण्यापूर्वी त्यांचे कमांडे प्रशिक्षण सत्र पोलिस मुख्यालयात सुरू आहे. सदर प्रशिक्षणादरम्यान २७ जून रोजी सहाय्यक फौजदार अडांगळे यांनी बी कंपनीच्या सर्व ४०  कर्मचाऱ्यांना आपल्या कंपनीची गोंदिया जिल्ह्यात ड्यूटी लागल्याने आपल्या वेतनामध्ये प्रोत्साहन भत्त्याचा फायदा होतो. तसेच रजेवर जाणे - येणे सोयीस्कर होते. तत्कालीन पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी प्रयत्न करून राज्य राखीव पोलिस बलाचे अपर पोलिस महासंचालक मुंबई येथून कंपनीची ड्यूटी गोंदिया जिल्ह्यात लावून घेतली आहे. यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून २० हजार रूपये गोळा करून विकास पाटील यांना पाठवायचे आहेत. यामुळे प्रत्येकी ५०० रूपये रक्कम गोळा करा, असे अडांगळे यांनी सांगितले. याबाबत एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली. २९ जून रोजी याबाबत पडताळणी करण्यात आली. यावेळी अडांगळे याची लाच स्वीकारण्याची तयारी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर लाच स्वीकारण्याचा प्रयत्न केल्याने काल ३ जुलै रोजी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-07-04


Related Photos