महत्वाच्या बातम्या

 नागपूर जिल्ह्यातील सर्व सरकारी कार्यालयामध्ये मास्क बंधनकारक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कोरोनाचा जगभरातील वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यात देखील प्रतिबंधात्मक उपाय हळूहळू करायला सुरुवात झाली आहे.
सर्वच जिल्हा प्रशासन सतर्क झाली असून स्थानिक पातळीवर काही निर्णय घेतले जात आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालयाच्या मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. शासकीय कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांनी देखील मास्क (Corona Mask) घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. मास्क संदर्भातल्या काढलेल्या पत्रामध्ये शासकीय व निमशासकीय कार्यालयात मास्क बंधनकारक असेल असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र हे विनंती स्वरूपात असल्याचे जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांचे म्हणणे आहे.
सध्या नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. पुढचे काही दिवस हे अधिवेशन चालणार आहे. या अधिवेशनासाठी अख्खे मंत्रिमंडळ आणि महत्वाचे नेते नागपुरात आहेत. सोबतच अधिवेशन काळात नागरिकांची देखील गर्दी नागपुरात होत असते. सध्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं नागपूर प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी
केंद्र शासनाकडून जारी करण्यात आलेल्या दिशानिर्देशानुसार आंतरराष्ट्रीय विमानाने नागपूर शहरात विदेशातून येणाऱ्या सर्व प्रवाशांची विमानतळावर थर्मल स्क्रिनिंग करण्यात येणार आहे. केंद्राच्या निर्देशानुसार काल शहरात दाखल होणाऱ्या २ टक्के प्रवाशांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिले आहेत.
कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशाच्या अनुषंगाने आयुक्तांनी संपूर्ण आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील आयुक्त सभागृहात आयुक्तांच्या अध्यक्षतेत यासंबंधी बैठक पार पडली. नागपूर शहरात दोहा आणि शारजा येथून दर आठवड्याला सहा विमाने येतात. या विमानातून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करून त्यापैकी २ टक्के प्रवाशांची चाचणी करण्यात येणार आहे. चाचणी नंतर घेण्यात आलेले नमूने मेडिकल, एम्स आणि मेयो येथील पॅथॉलॉजीमध्ये पाठविण्यात येणार आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता विमानतळ प्रशासनाशी समन्वयाने कार्य करून चाचणी करण्याबाबत आयुक्तांनी निर्देशित केले आहे.
शहरातील इतर व्यक्तींच्याही चाचणीसाठी मनपाद्वारे ३९ चाचणी केंद्र कार्यान्वीत करण्यात आलेली आहेत. सोबतच लसीकरणावरही भर देण्यात येत आहे. नागपूर शहरात आतापर्यंत कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणाचे एकूण ४३ लाख ८५ हजार ३६४ डोस पूर्ण झालेले आहेत. यापैकी अनेक जण अद्यापही बूस्टर डोसपासून वंचित आहेत. मनपाच्या इंदिरा गांधी रुग्णालय, पाचपावली रुग्णालय, के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आयसोलेशन हॉस्पीटल, आयुष दवाखाना या पाचही आरोग्य केंद्रांमध्ये बेड्स आणि ऑक्सिजन व्यवस्थेची तपासणी करून संपूर्ण यंत्रणा सज्ज करण्याचेही आयुक्तांनी सांगितले आहे. याशिवाय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय GMC (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय IGGMC (मेयो) येथेही ऑक्सिजन बेड्सच्या व्यवस्थेबाबत आढावा घेत त्यांनी संभाव्य धोका लक्षात घेता बेड्स तयार ठेवण्याची सूचना मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केली आहे.
कोरोना संबंधी कुठलीही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रातून नि:शुल्क चाचणी करून घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे. शहरात मनपाच्या दहाही झोनमध्ये ३९ चाचणी केंद्रांची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली आहे. अँटिजेन (Antigen) आणि आरटीपीसीआर (RTPCR) अशा दोन्ही चाचण्या या केंद्रांवर करण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोव्हिड संबंधित कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपली चाचणी करून घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करण्याचेही आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

  Print


News - Nagpur
Related Photos