राज्यातील आमदारांनी वनसंवर्धनासाठी घ्यावा पुढाकार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


- ‘ग्रीन अर्थ’च्या वृक्षदिंडीला प्रारंभ, ३ हजार किमीचा करणार प्रवास
- आमदार अनिल सोले यांचा पुढाकार
- ‘एक गाव, एक पाणवठा, एक जंगल’ मध्यवर्ती संकल्पना 
- नागपूर विभागात करणार वृक्षारोपण व जनजागरण
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
  राज्यात यंदा पडलेला दुष्काळ, वाढलेले तापमान बघता सर्व आमदारांनी पुढाकार घेऊन वनसंवर्धनाचे कार्यक्रम हाती घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. आमदार अनिल सोले यांच्यावतीने मागील तीन वर्षांपासून नागपूर जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या वृक्षदिंडी उपक्रमाचे कौतूक करताना त्यांनी राज्यातील सर्व आमदारांनी त्यांचा कित्ता गिरवावा, असे सांगितले.
आमदार अनिल सोले यांच्या ‘ग्रीन अर्थ ऑर्गनाझेशन’ च्या माध्यमातून नागपूर विभागातील नागपूरसह भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या सहा जिल्ह्यांमध्ये वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. २३ ते २९ जून दरम्यान सुमारे ३ हजार किलोमीटरचा प्रवास ही वृक्षदिंडी करणार असून गावागावात जनजागृती व वृक्षारोपण करणार आहे. ‘एक गाव, एक पाणवठा, एक जंगल’ मध्यवर्ती संकल्पना असलेल्या या वृक्षदिंडीचा उद्घाटन सोहळा रविवार वर्धा जिल्ह्यातील आंजी (मोठी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सुमारे तीन हजार लोकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात देवी नरसाबाईचे दर्शनाने झाली. त्यानंतर ग्रामपंचायतद्वारे तयार करण्यात येत असलेल्या ऑक्सिजन पार्कमध्ये मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षदिंडी रथाचे पूजनही यावेळी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अर्थ व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार होते तर खासदार रामदास तडस, माजी खासदार दत्ता मेघे, आंजीचे सरपंच जगदीश संचेरिया, सीईओ सचिन आंबोसे, वन संरक्षक सुनील शर्मा, ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री गाफट, भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राजेश बकाने, दादाराव केचे, सुरेश वाघमारे, विजय मेढे, अतुल तराळे, कौस्तुभ चॅटर्जी, डॉ. सचिन पावडे यांच्यासह आमदार अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार रामदास आंबटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वृक्षदिंडीचे संयोजक आशीष वांदिले, सहसंयोजक प्रशांत कामडी व वर्धा येथील सहसंयोजक सुनील गाफट यांचीदेखील उपस्थिती होती.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्याच्याच नाही तर देशाच्या विकासासाठी जितके अर्थशास्त्र महत्वाचे असते तितकेच पर्यावरण शास्त्रदेखील महत्वाचे असते. त्यामुळे पर्यावरणाकडे प्राधान्याने लक्ष देणे गरजेचे आहे. ‘जहाँ वन है, वही जल है… आनेवाली पिढी का सुनहरा कल है’ असा नारा त्यांनी यावेळी दिला. 
प्रास्ताविक आ. अनिल सोले यांनी केले. मागील तीन वर्षांपासून दिंडीचे आयोजन कसे होत आहे, कसे लोक आणि सामाजिक संस्था जोडल्या जात आहेत, याबद्दल त्यांनी माहिती दिली. जयश्री गफाट यांनी मागील काही वर्षांपासून ऑक्सीजन पार्कवर सुरू असलेल्या वृक्षारोपण उपक्रमावर प्रकाश टाकला. मागील वर्षी १८०० झाडे लावण्यात आली होती, त्यातील १६०० झाडे जगली असल्याचे त्या म्हणाल्या. रामदास आंबटकर यांनी वृक्षदिंडीला शुभेच्छा देताना सुधीर मुनगंटीवार यांच्याही कार्याचे कौतूक केले. 
सामाजिक वनीकरण विभाग, वनविभाग, आंजी ग्रामपंचायत आणि विविध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह सुमारे सहाशे लोक वृक्षदिंडीत सहभागी झाले होते. उलयी गाव, मांडवा, परसोडी, विरुळ, पुलगाव नगर परिषद येथे वृक्षारोपण केल्यानंतर देवळी मार्गे वर्धा येथे दिंडीचे आगमन झाले व नंतर सेवाग्रामला दिंडीने मुक्काम केला. सुधीर मुनगंटीवार, अनिल सोले, रामदास आंबटकर यांनी दिंडीसोबत पायीवारी केली. सोमवारी सकाळी ९ वाजता वर्धा येथे वृक्षारोपण केल्यानंतर वृक्षदिंडी पुढच्या प्रवासाला निघणार आहे. 
 

पथनाट्यातून वृक्षसंवर्धनाचा संदेश

वृक्षदिंडी दरम्यान युवकांच्यावतीने पथनाट्य देखील सादर करण्यात आले. पथनाट्यातून वृक्षारोपणासोबत, वॉटर हार्वेस्टींग, स्वच्छता आणि शिक्षणाचा संदेश देण्यात आला. मोठ्या संख्येने वृक्षदिंडीत सहभागी झालेल्या गावकर्यांसाठी पथनाट्य प्रमुख आकर्षण ठरले. 
 

हा आहे वृक्षदिंडीचा मार्ग

सोमवार, २४ जून, सकाळी ९ वाजता : सेवाग्राम, समुद्रपूर, जांब, हिंगणघाट, वरोरा, भद्रावती, तडाळी, चंद्रपूर येथे मुक्काम.
मंगळवार, २५ जून, सकाळी ९ वाजता : चंद्रपूर, मूल, चार्मोशी, गडचिरोली येथे मुक्काम.
बुधवार, २६ जून, सकाळी ९ वाजता : गडचिरोली, आरमोरी, वडसा, अर्जुनी मोरगाव, नवेगाव, सडक अर्जुंनी, गोरेगाव, गोंदिया येथे मुक्काम.
गुरूवार, २७ जून, सकाळी ९ वाजता : गोंदिया, तिरोडा, तुमसर, कांद्री, रामटेक, मनसर, पारशिवनी, सावनेर, पारडसिंगा येथे मुक्काम.
शुक्रवार, २८ जून, सकाळी ९ वाजता : पारडसिंगा, काटोल, कळमेश्वर, हिंगणा, हिंगणा टी पॉइंट, लक्ष्मीभुवन चौक, कमाल चौक, गोळीबार चौक, डॉ. आंबेडकर चौक, जगनाडे चौक, अशोक चौक, कॉटन मार्केट, रवीभवन येथे मुक्काम.
शनिवार, २९ जून, सकाळी ८ वाजता : सक्करदरा चौक, उमरेड येथे समारोप.    Print


News - Nagpur | Posted : 2019-06-23


Related Photos