अहेरी विधानसभा क्षेत्रात राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्यामुळे भाजपाला नवसंजीवनी


- निवडणूकीच्या तोंडावर मंत्रीपदाच्या राजिनाम्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पाच वर्षांआधी उमेदवारही मिळेना अशा अहेरी विधानसभा क्षेत्रात राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्या  प्रवेशाने भाजपाला विधानसभेचा उमेदवार मिळाला. युवा, तडफदार, उच्चशिक्षित आणि दुरदृष्टी असलेला नेता म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आणि कार्यकर्त्यांची फळी वाढविली. यामुळेच भाजपाला या क्षेत्रात नवसंजीवनी मिळाली. मात्र आता निवडणूका तोंडावर असताना राजे अम्ब्रीशराव महाराज आत्राम यांच्याकडून राज्यमंत्रीपदाचा राजिनामा घेण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
२००९ च्या निवडणूकीत गडचिरोली जिल्ह्यात भाजपा नेस्तनाबूत झाली होती. खासदार आणि जिल्ह्यातील तिनही आमदार काॅंग्रेसचे होते. यामुळे भाजपाला जिल्ह्यात आपले स्थैर्य निर्माण करण्यासाठी २०१४ च्या लोकसभा तसेच विधानसभा निवडणूकीसाठी पर्याय शोधणे गरजेचे झाले. यामुळे युवा नेतृत्व असलेले व स्व. राजे विश्वेश्वरराव महाराज, स्व. सत्यवानराव महाराज यांनी हजारो कार्यकर्त्यांची फळी सांभाळलेल्या नागविदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष राजे अम्ब्रीशराव यांना भाजपात आणण्याचे प्रयत्न झाले. वर्धा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी भाजपात प्रवेश घेतला. लोकसभा निवडणूकीत राजे आत्राम यांनी आपल्या संपूर्ण कार्यकर्त्यांना कामाला लावले.  तसेच नागविदर्भ आंदोलन समितीच्या ५० हजाराहून अधिक कार्यकर्त्यांना स्वतःसोबत घेवून काम सुरू केले. यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाला घवघवित यश मिळाले. यानंतर राजे आत्राम यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. यावेळी त्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्र पिंजून काढला. सिरोंचा सारख्या ठिकाणी  हजारो लोक जोडण्याचे काम त्यांनी केले. विधानसभेत विजयी झाल्यानंतर त्यांची राज्यमंत्री पदी वर्णी लागली आणि एक युवा नेता जिल्ह्याला पालकमंत्री लाभला. पालकमंत्री झाल्यापासून त्यांनी कोट्यवधींचा निधी खेचून आणला. आजपर्यंत एकाही नेत्याने केली नाहीत एवढी विकासकामे मंजूर झाली. तसेच जिल्ह्यातील तालुका मुख्यालयांच्या ग्रामपंचायतींना नगर पंचायतींचा दर्जा मिळाला, कोट्यवधींचा विकासनिधी मिळाला. भाजपाला सुध्दा वर आणण्याचे काम झाले. यामुळे जिल्हा परिषदा, नगर पंचायतींच्या निवडणूकांमध्येही मोठे यश मिळाले. जिल्हा परिषदेवर भाजपाची सत्ता आली. 
राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी आपल्या मंदीपत्राच्या काळात जिल्ह्याच्या हिताचेच काम केले आहे. मात्र पाहिजे त्या प्रमाणात प्रसिध्दी केली नाही.  जिल्ह्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे युवकांना रोजगार मिळावा यासाठी रोजगार मेळावे आयोजित केले. सुरजागड लोह प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेतली, लोहप्रकल्प जिल्ह्यातच उभारावा यासाठी पाठपुरावा केला, या पाठपुराव्याला यशही मिळाले. तसेच आज तेलंगणा सरकारच्या वतीने उद्घाटन होत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या सिंचन प्रकल्प असलेल्या मेडीगट्टा प्रकल्पासाठीही महाराष्ट्र सरकारच्या वतीने महत्वाची भूमिका निभावली. कामे करताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला नाही. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले. त्यांची काम करण्याची शैली वेगळी असली तरी त्यांनी नेहमी विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या साडेचार वर्षांच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा अथवा निष्क्रीयतेचा कोणताही ठपका नाही. राजे आत्राम हे स्वतः एका पक्षाचे केंद्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी विकासात्मक भूमिका ठेवणाऱ्या भाजपा पक्षाशी हात मिळवणी करून जनतेला आवश्यक असलेली विकासकामे करण्याकडे लक्ष्य केंद्रीत केले. मात्र भ्रष्टाचार आणि निष्क्रीयतेच्या व्याख्येत बसत नसतानाही  नुकत्याच करण्यात आलेल्या मंत्रीमंडळ विस्तारात राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्यावर असमाधानकारक कामाचा ठपका ठेवून राजिनामा घेण्यात आला. यामुळे जिल्ह्यातील समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये  नाराजी पसरली आहे. यामुळे आगामी निवडणूकीत भाजपाला फटका सहन करावा लागू शकतो.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-06-21


Related Photos