चिमूर विधानसभा क्षेत्रात आरोग्य यंत्रणेचे तीनतेरा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चिमूर : 
आम आदमी पार्टी तर्फे घेण्यात आलेल्या सर्वेक्षण आढाव्यात चिमूर विधानसभेतील नागभीड, चिमूर, भिसी, नेरी, खडसंगी येथील ग्रामीण आरोग्य रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रात  अनेक उणीवा आढळून आल्या आहेत.
 चिमूर येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ९८ पदांपैकी ४९ पदे रिक्त आहेत, जवळपासच्या ग्रामीण भागातील दररोज सरासरीने ४५० रुग्ण या आरोग्य केंद्रात येतात, परंतु अपुऱ्या कर्मचार्यांच्या संखेमुळे या रुग्णांची गैरसोय होत आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या कर्मचार्यांचे वेतन हे महिनो-महिने  होत नाही. या आरोग्य केंद्राला पिण्याच्या पाण्याची सोय एका विहिरी मार्फत होत असून ही विहिर खचलेल्या व नादुरुस्त अवस्थेत आहे. कित्येक वर्षांपासून जनरेटर ची सोय नसल्यामुळे गरोदर माता व रुग्णांचे भर उन्हाळ्यात हाल होत आहेत.
नागभीड येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात ११ पदे रिक्त असून पूर्णवेळ आरोग्य अधिक्षकाचे पद अजूनही भरले गेले नाही. रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या जेवणामध्ये अनेक उणीवा आढळून आलेल्या आहेत. नागभीड येथील रुग्णालय हे गावाच्या बाहेर असून रात्रवेळेस महिला वैध्यकीय अधिकारी, परिचारिका, तसेच महिला रुग्णाच्या संरक्षणासाठी कुठलीही ठोस तरतूद नाही. 
नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांचा तुटवडा हा नेहमीचाच विषय असून अत्यावश्यक लस, तसेच अनेक आवश्यक औषधे हे वेळेवर उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे बरेचदा रुग्णांना नाईलाजास्तव खाजगी मेडीकल मधून महागडे औषध खरेदी करावे लागतात. नेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात असलेले शौचालय हे पूर्णता जीर्ण असून अतिशय दुर्लक्षित आहे. अत्यावश्यक असलेली रुग्णवाहिका गेली कित्येक वर्ष बंद अवस्थेत पडलेली आढळून आली आहे.  
दररोज जवळपास १०० रुग्ण भेट देत असलेल्या भिसी येथील प्राथमिक आरोग्य रुग्णालयात ०९ पदे रिक्त आहेत. अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत असलेला जनरेटर अजूनही दुरुस्त झालेला नाही, त्यामुळे उन्हाळ्यात भरती झालेल्या गरोदर मात्तांचा तसेच रुग्णांचे हाल होत आहेत. खडसंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ०४ पदे रिक्त असून पूर्णवेळ कर्मचार्यांच्या उपस्थिती बद्दल अनियमितता आढळून आलेली आहे. रुग्णालयाच्या बांधलेल्या नवीन इमारतींना जागोजागी तडे गेले आहेत. कर्मचार्यांसाठी बांधलेल्या क्वार्टरचे बांधकाम जीर्ण अवस्थेत असून अनेक वर्षांपासून जुन्या इलेक्ट्रिक तारा अजूनही उघल्या अवस्थेत आहेत.
आप तर्फे घेण्यात आलेल्या चिमूर विधानसभेतील आरोग्य यंत्रणेच्या या सर्वेक्षण आढाव्यात अश्या अनेक उणीवा आढळून आल्या आहेत. लोकप्रतिनिधी तसेच प्रशासन ग्रामीण लोकांच्या आरोग्याबाबाद अतिशय उदासीन आहे असे या सर्वेक्षणातून प्रतीत होत आहे. या आढाव्याची प्रत दिल्ली येथील आप च्या केंद्रीय समितीकडे तसेच महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात येत आहे.                                  
प्रा. डॉ. अजय घनश्याम पिसे यांच्या नेतृत्वात हा सर्वेक्षण आढावा घेतला गेला असून त्यामध्ये सुरेश  कोल्हे, माधव  पिसे, शिगाल पाटील, लोकेश बंडे, विलास  पिसे, देवानंद गायधनी, पुष्पाताई गोल्हेर, मकसूद शेख, पवन पिसे व इतर मान्यवरांनी सहभाग घेतला.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-05-22


Related Photos