महत्वाच्या बातम्या

 एलसीबी पोलिसांच्या सतर्कतेने गणेश विसर्जनातील विघ्न टळले : सुरी, फायटरसह तरुण ताब्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य अनुचित घटना टळली. गोलबाजार परिसरात धारदार हत्यारे घेऊन फिरणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला एलसीबी पथकाने ताब्यात घेत त्याच्याकडून लोखंडी सुरी आणि फायटर जप्त केला.

आर्यन किशोर पचारे १९ वर्षे रा. जलनगर वॉर्ड, चंद्रपूर असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. २५ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने एलसीबीचे पथक शहरात बंदोबस्त व पेट्रोलिंग करीत असताना गोलबाजार परिसरात एक इसम धारदार हत्यार बाळगून फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाली.

माहितीची खात्री करून पथकाने कारवाई करीत आर्यन पचारे याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडे अंदाजे २०० रुपये किमतीची लोखंडी सुरी आणि २०० रुपये किमतीचा लोखंडी फायटर आढळून आला. पोलिसांनी दोन्ही हत्यारे जप्त केली.

याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम ४ व २५(१-ब)(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय तपासणीनंतर आरोपीला पुढील तपास व कायदेशीर कारवाईसाठी चंद्रपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोहवा इम्रान खान, किशोर वैरागडे, पोअं सुमित बरडे यांनी केले. 

गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलिसांकडून शहरातील संवेदनशील भागात विशेष पेट्रोलिंग व निगराणी ठेवण्यात येत आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे मिरवणुकीदरम्यान संभाव्य धोका टळल्याचे दिसून आले.





  Print






Related Photos