महत्वाच्या बातम्या

 भद्रावतीत धक्कादायक प्रकार! तरुणाच्या घरात तलवारी अन् खंजर : पोलिसांच्या धडक कारवाईने खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस   
प्रतिनिधी / चंद्रपूर : भद्रावती शहरातील खापरी वॉर्ड क्रमांक ३ येथे एका तरुणाच्या घरातून तीन धारदार तलवारी आणि एक खंजर आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने ११ ऑक्टोबर रोजी ही कारवाई केली. या कारवाईत १३ हजार रुपये किमतीची चार घातक शस्त्रे जप्त करण्यात आली असून, गोविंदा मारोती बावणे २६वर्ष  याच्याविरुद्ध शस्त्र अधिनियमानुसार गुन्हा दाखल करून अटक करण्यात आले आहे.

गोविंदा बावणे याच्या घरात घातक शस्त्रे असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घराची तपासणी केली असता तीन तलवारी आणि एक खंजर आढळून आला. पोलिसांनी ही सर्व शस्त्रे जप्त केली. धारदार शस्त्रे घरात आढळल्याने या प्रकरणाकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले आहे.

जप्त करण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये पाच हजार रुपये किमतीची एक तलवार, चार हजार रुपये किमतीची दुसरी तलवार, तीन हजार रुपये किमतीची तिसरी तलवार आणि एक हजार रुपये किमतीचा खंजर यांचा समावेश आहे. या प्रकरणी पोलीस अंमलदार खुशाल कावळे यांच्या तक्रारीवरून भद्रावती पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ०४६/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ४ व २५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल आणि प्रभारी अधिकारी सचिन खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक संतोष केदार, पोलीस हवालदार गोपाल आतकुलवार, देवानंद डुकरे, अनुप आष्टुनकर, प्रशांत शेंदरे तसेच पोलीस अंमलदार योगेश घाटोळे, खुशाल कावळे, संतोष राठोड आणि महिला पोलीस अंमलदार मोनाली गारघाटे यांनी केले.





  Print






Related Photos