महत्वाच्या बातम्या

 दिव्यांगांना वैश्विक ओळखपत्रासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र शासनाने दिव्यांगांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र वितरण करण्यासाठी वैश्विक ओळखपत्र वितरण प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे ज्या दिव्यांगांनी अद्यापपर्यंत दिव्यांग प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला नाही अशांनी ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

राज्यामध्ये सदर प्रणालीव्दारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सर्व शासकीय जिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये तसेच विनिर्दिष्ट केलेले महानगरपालिकेचे वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालये यांच्या मार्फत वितरण प्रक्रीया चालू करण्यात आली आहे. यासाठी दिव्यांगांनी वैश्विक ओळखपत्रासाठी www.swavlambancard.gov.in या संकेतस्थळावर जाऊन वैयक्तिक पुर्ण तसेच दिव्यांगत्वाची माहिती भरुन ऑनलाईन अर्ज सादर करावा.

दिव्यांग व्यक्तींकडे इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यास ऑनलाईन अर्ज करता येतो. आपले सरकार सेवा केंद्रामध्ये अल्प मोबदला देऊन ऑनलाईन अर्ज करता येतो. अर्ज भरल्यानंतर दिव्यांग व्यक्तीस त्यांच्या अर्जाची पावती प्राप्त होते. पावतीवर त्यांच्या जिल्ह्यातील रुग्णालयाची यादी दिसेल. अर्जदाराला त्यांच्या दिव्यांगत्व प्रकारानुसार घराजवळील रुग्णालयात तपासणी करीता जाता येईल. सदर अर्ज ऑनलाईन पध्दतीने संबंधित जिल्ह्याच्या जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध होतो. संबंधित अर्जाची जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता पडताळणी करुन  दिव्यांगत्वाचे मुल्यांकन करणाऱ्या तज्ञाकडे पाठविण्यात येते. तंज्ञाकडून अर्जदाराचे मुल्यांकन झाल्यानंतर ऑनलाईन संकेतस्थळावर अद्यावत करण्यात येते.

सदर ऑनलाईन अर्ज संबंधित रुग्णालयाच्या दिव्यांग वैद्यकीय मंडळाकडे वर्ग होतो. दिव्यांग वैद्यकीय मंडळाने दिलेले निर्देश ऑनलाईन संकेतस्थळावर अद्यावत केल्यानंतर दिव्यांग लाभार्थ्यांना वैश्विक ओळपत्र व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र ऑनलाईन उपलब्ध होते. जिल्हा शल्य चिकित्सक, अधिष्ठाता यांच्याकडून ऑनलाईन जनरेट केलेल्या वैश्विक ओळखपत्र महाराट्र राज्यासाठी नेमलेल्या प्रिंटींग एजन्सीकडे हस्तांतरीत केले जाते. प्रिंटींग एजन्सीव्दारे वैश्विक ओळखपत्रे संबंधित दिव्यांग लाभार्थ्यांना ही ओळखपत्रे स्पीड पोष्टव्दारे घरपोच  प्राप्त होतात. याबाबत काही अडचण असल्यास जिल्हा समाज कल्याण कार्यालयाच्या०७१५२-२४२७८३ या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्राजक्ता इंगळे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos