महत्वाच्या बातम्या

 फुले- आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क, गडचिरोली येथे जाणीव जागृती कार्यशाळा संपन्न


- सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा तसेच महिला व बालकांसंबंधी गुन्हे 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारे संचालित फुले-आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली येथे ५ ऑगस्ट २०२३ रोजी सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली, भरोसा सेल गडचिरोली तथा राष्ट्रीय सेवा योजना विभाग सांस्कृतिक विभाग आणि महिला कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने सायबर गुन्हे व सायबर सुरक्षा तसेच महिला व बालकांसंबंधी गुन्हे यासंबंधीची जाणीव जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली. 

या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना महिला तथा बालकांसंबंधी होणारे गुन्हे, त्याचे प्रकार, त्यासंबंधीच्या कायदे, तसेच विद्यार्थ्यांनी या सर्व प्रकारच्या गुन्ह्यांपासून कशाप्रकारे सजग राहिले पाहिजे, सायबर सुरक्षा कशी पाळली गेली पाहिजे, आजच्या मोबाईलच्या युगामध्ये व्हाट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम यांसारख्या सोशल नेटवर्किंग साईटवर कशाप्रकारे ऑनलाईन फ्रॉड होत असतात, आपल्या माहितीची चोरी होऊन कशाप्रकारे ब्लॅकमेलिंग सारखे गुन्हे होत असतात. या महत्त्वपूर्ण विषयावर विद्यार्थ्यांना उदाहरणांसहित कायद्यांची माहिती देत जाणीव जागृती करण्यात आली.

या कार्यशाळेसाठी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून निलेश कुमार वाघ, पोलीस उपनिरीक्षक सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली हे उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनामध्ये वाघ यांनी ओटीपी आणि पासवर्ड च्या माध्यमातून होणारे फ्रॉड, अनोळखी व्यक्तींचे व्हाट्सअप पिंक लिंक व्हिडिओ कॉल ऑडिओ कॉल याद्वारे होणारी फसवणूक तथा जॉब च्या नावे एखाद्या स्कीमच्या नावे ऑनलाईन प्रॉडक्टच्या नावे फेक अकाउंट यांसारख्या विविध प्रकारात कशाप्रकारे ऑनलाइन फसवणूक होते, आपण कसे या फसवणुकीला बळी पडतो. याविषयी विस्ताराने माहिती दिली. 

विविध सोशल नेटवर्किंग साईट वापरत असतांना कोणत्याही अनोळखी लिंक क्लिक करू नका, अनोळखी व्हिडिओ ऑडिओ मजकूर शेअर डाऊनलोड करू नका, असे केल्यास नकळतपणे आपल्या हातून गुन्हा घडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि तसे झाल्यास आयटी ऍक्ट अंतर्गत शिक्षेचे प्रावधान असल्याची माहिती वाघ यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिली. त्यासोबतच विविध सोशल नेटवर्किंग साईट साठी टू स्टेप वेरिफिकेशन, ब्लू चेक मार्क, आउटपुट साईट यासारख्या महत्त्वपूर्ण सायबर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या बाबी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून समजावून सांगितल्या तसेच सायबर गुन्ह्यासंबंधी काही अडचणी असल्यास १९३० हेल्पलाइन क्रमांक तसेच ९४२२१५१००१ सायबर सेल गडचिरोली हे संपर्कासाठीचे नंबर देऊन आपल्या भोवताली उपरोक्त प्रकारे कुठलीही सायबर क्राईम ची घटना घडत असल्याचे निदर्शनात आल्यास आपल्या संपर्कातील लोकांना सतर्क करा आणि या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कार्यशाळेदरम्यान वाघ सरांनी विद्यार्थ्यांना केले.

या कार्यशाळेसाठी महिला तथा बालकांसंबंधी गुन्हे या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक म्हणून रुपाली पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक भरोसा सेल गडचिरोली या उपस्थित असून त्यांनी आपल्या मार्गदर्शनात महिला तथा बालकांसंबंधी गुन्हे कशा प्रकारे घडतात. हे गुन्हे घडत असताना आपण जर सतर्क राहिलो तर वेळेत गुन्हे होणे टाळू शकतो, आपण कुणाच्याही चांगल्या बोलण्याला बळी न पडता, गोड बोलण्याला बळी न पडता, भूलथापांना बळी न पडता स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा विचार करून योग्य सतर्कता बाळगल्यास कित्येक गुन्ह्यांना पायबंद घालता येईल, असे मत व्यक्त करत आपल्या सोबत जर काही अनुचित प्रकार घडत असेल तर शांत न राहता सहन न करता समोरची व्यक्ती कोणीही असेल तिच्याविषयी आई वडील गुरुजनवर्ग तथा पोलीस यांच्या सोबत चर्चा करा माहिती द्या असे आपण केल्यास होणारा मोठा अनर्थ टळेल, असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले. 

त्याचबरोबर या कार्यशाळे प्रसंगी गडचिरोली शहरातील भरोसा सेल, निर्भया दामिनी पथक, १५ ते १८ वयोगटातील मुलामुलींसाठी बालस्नेही पोलीस मंडळ यांच्या विषयी विस्ताराने माहिती विद्यार्थ्यांना दिली. महिला अत्याचार प्रतिबंधक अधिनियम, बाल संरक्षण अधिनियम, महिला तथा बालकांचे अत्याचारापासून संरक्षण अधिनियम, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम या कायद्याविषयी विषयी विस्ताराने विद्यार्थ्यांना माहिती दिली. बालक तथा महिला संबंधी होणारे गुन्हे किंवा त्या प्रकारचे काही कृत्य आपल्याला आढळून आल्यास शांत न राहता १०० नंबर वर संपर्क करा किंवा पोलिसांची संपर्क करा, असे आवाहन या कार्यशाळे प्रसंगी आपल्या मार्गदर्शनात पाटील यांनी केले.

या कार्यशाळेच्या अध्यक्ष स्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश के. खंगार हे असून त्यांनी आपले अध्यक्ष मार्गदर्शनात विविध प्रकारचे हिंसाचाराचे गुन्हे तथा ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे हे घडत असताना एक गोष्ट प्रामुख्याने महत्त्वाची आहे. ती म्हणजे आपली स्वतःची सतर्कता आपण जर सतर्कता दाखविली वेळीच जागरूक होऊन इतरांना होणाऱ्या घटनेची माहिती दिली. अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती देण्याचे टाळले, ऑनलाईन पद्धतीने आपले बँकेची माहिती, वैयक्तिक माहिती, विविध ओटीपी जर आपण समोरच्या व्यक्तींना दिलेच नाही तर ऑनलाईन फ्रॉड किंवा हिंसाचाराच्या घटना बऱ्याच प्रमाणात कमी होतील, असे मत व्यक्त केले. सोबतच आपण आपली कुठलीही वैयक्तिक माहिती कितीही जवळची व्यक्ती असेल तरी ती शेअर करू नका इतरांना माहीत होऊ देऊ नका, असे आवाहन विद्यार्थ्यांना आपल्या मार्गदर्शनात खंगार यांनी केले.

या कार्यक्रमासाठी उपरोक्त मान्यवरांसोबतच योगेश खोब्रागडे व  सचिन नैताम सायबर पोलीस स्टेशन गडचिरोली तथा समस्त प्राध्यापक वृंद, ग्रंथालयीन कर्मचारी, शिक्षकेतर कर्मचारी तथा १३० विद्यार्थी उपस्थित असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिपक तायडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. कविता उईके यांनी केले असून आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या ग्रंथपाल प्रा. वर्षा तिडके यांनी केले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos