चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह इतरांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर :
राजुरा येथील वसतिगृहातील अल्पवयीन आदीवासी मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी केलेल्या असंवेदनशील वक्तव्याप्रकरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा संबंधित वसतिगृहाच्या संस्थेचे अध्यक्ष सुभाष धोटे यांच्यासह इतरांवर येथील रामनगर पोलीस ठाण्यात  बुधवारी रात्री अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
 १३ एप्रिल रोजी अत्याचाराची घटना  उघडकीस आली. या प्रकरणात न्यायालयाने दोन महिलांसह पाच जणांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चंद्रपूर जिल्हा न्यायाधीश अंसारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली असून जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी एसआयटी गठित केली आहे.
तीन वेगवेगळ्या यंत्रणा तपास करीत असताना काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार, सुभाष धोटे व लोकसभेचे उमेदवार बाळू धानोरकर यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन मुलींचे पालक शासकीय मदतीसाठी तक्रारी करीत असल्याचे वक्तव्य केले होते. त्याचे संपूर्ण विदर्भात संतप्त पडसाद उमटले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी मंगळवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन दिलगिरी व्यक्त केली. तसेच सुभाष धोटे यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून जाहीर माफी मागितली.
दरम्यान, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आदिवासी संघटनांनी तक्रारी सादर करून या तीनही नेत्यांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर बिरसा क्रांती दलाचे जिल्हाध्यक्ष कमलेश आत्राम यांच्या तक्रारीवरून सुभाष धोटे यांच्यासह इतरांविरुद्ध कलम ३, १ (आर) अनुसूचित जाती-जमाती सुधारित अधिनियम २०१५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-04-25


Related Photos