महत्वाच्या बातम्या

 सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांची आत्महत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या केली. कर्जतमधील एनडी स्टुडीओमध्ये गळफास घेत देसाई यांनी आपले आयुष्य संपवले. देसाईंच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक ऑडियो क्लिप रेकॉर्ड केल्याची माहिती समोर आली होती. आता त्यात त्यांनी काय म्हटले आहे याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांनी या क्लिपची सुरुवात लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे म्हणत केल्याचे सांगण्यात येत आहे.

नितीन देसाई यांनी केलेल्या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये ११ ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे. वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार हे रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे. तसेच एन.डी. स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहन देसाईंनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केले आहे. यात राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावे अशी माझी इच्छा आहे, मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, कारण एन.डी. स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभे केलेले मोठे कलामंच आहे असे देसाईंनी या क्लिपमध्ये म्हटले आहे.

माहितीनुसार दिल्लीहून एनडी स्टुडिओला परतल्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला बंगल्याच्या आसपास कोणी फिरू नका, असे सांगितले. तसेच एक व्हॉईस रेकॉर्डर दिला आणि हा रेकॉर्डर बहिणीकडे सोपवावा असे देखील कर्मचाऱ्याला सांगितले. सकाळी आठ वाजेपर्यंत कर्मचाऱ्याला कोणतीही हालचाल दिसली नाही. त्याने पहिल्यांदा व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकली आणि पहिल्या ऑडिओ क्लिपचे पहिले वाक्य ऐकून त्याला धक्काच बसला. लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे पहिल्या ऑडिओ क्लिपमधील पहिले वाक्य होते. हे ऐकताच कर्मचाऱ्यांने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. ऑडिओ क्लिप्समध्ये देसाईंनी त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या चार व्यावसायिकांची नावं घेतल्याचे समजते. या क्लिप्समधल्या देसाईंच्या आवाजाच्या नमुन्याची फॉरेन्सिक टीमकडून आधी तपासणी होईल. आणि त्यानंतरच पुढची कार्यवाही करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

नितीन देसाईंच्या पार्थिवावर काल रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आले. चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम केले. देसाईंचा मृत्यू गळफास लावण्याने झाला, असा प्राथमिक निष्कर्ष पोस्टमॉर्टममधून समोर आला आहे. दरम्यान, देसाईंच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील, त्याच्या काही तास आधी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos