न्यूझीलंडमधील एका माथेफिरूने ख्राईस्टचर्च मध्ये केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेत घडविले स्फोट


-  हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’
- आत्तापर्यंत ३२० जणांचा मृत्यू 
वृत्तसंस्था / कोलंबो : 
श्रीलंकेमध्ये रविवारी घडवण्यात आलेल्या भयंकर साखळी स्फोटांमध्ये आत्तापर्यंत ३२० जणांचा मृत्यू झाला आहे. या दहशतवादी आत्मघातकी हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ या कुख्यात कट्टर मुस्लिम दहशतवाद्यांचा हात असल्याचे बोलले जात आहे. न्यूझीलंडमध्ये काही दिवसांपूर्वी एका माथेफिरूने ख्राईस्टचर्च भागातील दोन मशिदींमध्ये अंदाधुंद गोळीबार केला होता. या गोळीबारामध्ये ५० जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी श्रीलंकेत स्फोट घडवून आणण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. 
श्रीलंकेचे उपसंरक्षणमंत्री रुवान विजेवार्देन यांनी तिथल्या संसदेला माहिती देण्यासाठी केलेल्या भाषणामध्ये स्फोटांमागील कारणाचा खुलासा झाला आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरीसेना यांनी या स्फोटांमागे ज्या दहशतवाद्यांचा हात आहे त्यांना शोधून काढण्यासाठी इतर देशांकडून सहकार्य मागितले आहे. स्फोटांचा कट रचण्यापासून ते घडवून आणण्यापर्यंत विदेशी दहशतवाद्यांनी मदत केली असावी असा दाट संशय आहे. हे दहशतवादी शोधून काढण्यासाठी इतर देशांकडून सहकार्य मागण्यात आले आहे.
‘नॅशनल तौहीद जमात’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असली तरी त्यांना बाहेरून मदत मिळाल्याशिवाय ते इतके मोठे हल्ले करूच शकत नाही असं श्रीलंकेच्या आरोग्यमंत्री रजिथा सेनारत्ने यांनी म्हटले आहे.
रविवारी स्फोटांनी कोलंबो हादरले असतानाच सोमवारी मध्य कोलंबोतील एका बस स्थानकावर आणखी ८७ डिटोनेटर्स पोलिसांना आढळून आल्याने मोठी खळबळ माजली आहे. त्यामुळे या साखळी स्फोटांमागे मोठा कट रचण्यात आल्याची शंका व्यक्त होत आहे. यातील १२ बॉम्ब डिटोनेटर्स बस स्थानकाच्या मैदानात सापडले. त्यानंतर शोधमोहीम सुरू करताच आणखी ७५ डिटोनेटर्स त्याच परिसरात आढळून आले, असे पोलिसांनी सांगितले. 
श्रीलंकेच्या इतिहासातील सर्वात मोठय़ा ठरलेल्या या दहशतवादी आत्मघाती हल्ल्यामागे ‘नॅशनल तौहीद जमात’ नावाच्या स्थानिक दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे श्रीलंकेचे आरोग्यमंत्री रजित सेनारत्ने यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हे हल्लेखोर श्रीलंकन असल्याचाच सरकारचा अंदाज आहे. विशेष म्हणजे सरकारी गुप्तचर यंत्रणेने या प्रकारच्या हल्ल्याची भीती 11 एप्रिल रोजीच व्यक्त केली होती. याबाबत त्यांनी श्रीलंकेच्या पोलीस महासंचालकांना सतर्क राहण्याचा इशाराही दिला होता.

डेन्मार्कच्या अब्जाधीशाची तीन मुले ठार

रविवारी कोलंबोत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात डेन्मार्कचा अब्जाधीश अंद्रेस पॉलसन यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला. ते, पत्नी आणि चार मुलांसह श्रीलंकेत सुट्टी घालवण्यासाठी आले होते. रविवारी ईस्टर संडेनिमित्ताने पॉलसन कुटुंबासह चर्चमध्ये गेले असताना झालेल्या बॉम्बस्फोटात त्यांच्या तीन मुलांचा मृत्यू झाला.

  आतापर्यंत ८ भारतीय ठार

श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटांमधील मृतांमध्ये 8 हिंदुस्थानींचा समावेश आहे. एच. शिवकुमार, वेमुराई तुलसीराम, एस. आर. नागराज, के. जी. हनुमंतरायप्पा, एम. रंगप्पा, लक्ष्मी, नारायण चंद्रशेखर, रमेश अशी मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये कर्नाटक, तामीळनाडूचे रहिवासी आहेत.   Print


News - World | Posted : 2019-04-23


Related Photos