महत्वाच्या बातम्या

 जुलैमध्येच रेकॉर्डब्रेक पाऊस, ऑगस्टमध्ये काय असेल पावसाची स्थिती : आयएमडी ने जारी केला नवा अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाने थैमान घातले होते. मुंबईसह पुणे, उत्तर, पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भात पावसाने चांगलाच जोर धरला होता. अनेक भागात पावसाने पूरस्थिती निर्माण झाली होती.

या पुरात अनेकांचा संसारदेखील वाहून गेले होते. जुलैमध्ये झालेल्या पावसाने अनेक जलाशय व धरणे ओसंडून वाहू लागले आहेत. मात्र, येत्या काही दिवसांत पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर आजपासून पावसाची तीव्रता कमी होणार आहे. ऑगस्टच्या सुरुवातीच्या आठवड्यातही पावसाचा प्रभाव कमी असणार आहे. 

पावसाची तीव्रता कमी -

जुलै महिन्यात झालेल्या धुवांधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र, जुलै महिन्याच्या अखेर पावसाची तीव्रता कमी होणार आहे. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्यातील पहिले दहा दिवसही पावसाचा जोर ओसरणार असल्याचे भाकित हवामान विभागाने केले आहे. तर, पुढील दोन दिवस कोकण व विदर्भात सौम्य पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. राज्यातील पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात येत्या दोन ते तीन दिवसांत मध्यम स्वरुपात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईतही पावसाचा जोर ओसरणार आहे. तर, मराठवाड्यात येत्या २४ तासांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे.

जुलैमध्ये १७ टक्के अधिक पाऊस -

हवामान विभागाने (आयएमडी) दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर, पूर्व विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला होता. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीच्या १७ टक्के जास्त पाऊस झाला होता.

मराठवाड्यात अद्यापही पावसाचा जोर कमी -

दरम्यान, पूर्ण राज्यात पावसाने चांगलाच जोर धरला होता. अनेक जिल्ह्यात धरण व जलाशय तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक धरणे पूर्ण भरल्यामुळे पाणी चिंता मिटली आहे. पण एकीकडे उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अद्यापही पुरेसा पाऊस झाला नाहीये. त्या तुलनेत कोकणात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी चिंतेच्या सावटाखाली आहे. जर या भागात अपेक्षेनुसार पाऊस झाला नाही तर काही जिल्ह्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होईल.

नाशिकच्या कळवण, सटाणा, मालेगाव व देवळा परिसरात अत्यल्प पावसाने शेतकरी चिंतेत असतांनाच. बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात समाधानकारक पाऊस बरसत मोसम खोऱ्याला वरदान ठरलेल्या हरणबारी धरण ओव्हर फ्लो झाले झाल्याने मोसम खोऱ्यातील शेतकरी आनंदला असून धरणातून मोसम नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आल्याने मोसम नदी दुथडी वाहू लागल्याने समाधान पसरले आहे.





  Print






News - Rajy




Related Photos