महत्वाच्या बातम्या

 शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत २९ जुलैला होणार लाभार्थ्यांना लाभांचे वितरण


- मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

- सावनेर येथील शासकीय वसतिगृहाचेही होणार लोकार्पण  

- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा अभिनव उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : शासन आपल्या दारी या उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे प्रत्यक्ष वितरण आणि सावनेर येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवनिर्मित इमारतीचे दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण शनिवार २९ जुलै रोजी करण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक उपायुक्त सिद्धार्थ गायकवाड व सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी २७ जुलै २०२३ ला पत्रकार परिषदेत दिली.

कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी दहा वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा व लाभांचे प्रत्यक्ष वितरण होणार आहे. जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया, नागपूर महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, उपायुक्त तथा सदस्य जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सुरेंद्र पवार यांची विशेष उपस्थिती राहणार आहेत.  

कार्यक्रमादरम्यान जिल्ह्यातील संपूर्ण वसतिगृह व निवासी शाळांना जोडणाऱ्या सीसीटीव्ही युनिटचे ऑनलाईन उदघाटन करण्यात येणार आहे. मांग, मातंग, गारोडी समाजातील लोकांना रमाई आवास घरकुल योजनेचे वाटप, कन्यादान योजनेंतर्गत सामूहिक विवाह सोहळ्यात भाग घेऊन विवाह करणाऱ्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप, आदी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, मृत पावलेल्या सफाई कामगारांच्या वारसांना धनादेश वितरण, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना टॅब वितरण, दिव्यांगांना साहित्य वाटप आदी योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ वाटप करण्यात येणार आहे.   

सामाजिक न्याय विभागाच्या अनेक जनकल्याणकारी योजना आहेत. या योजनांची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी कार्यक्रमानंतर मार्गदर्शन शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत आतापर्यंत जिल्हानिहाय लाभार्थ्यांना सर्व विभागाच्या योजनांचा एकत्र लाभ देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. मात्र, राज्यात शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागामार्फत शासन आपल्या दारी या उपक्रमाचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos