महत्वाच्या बातम्या

 अंतिम मुदतीची वाट न पाहता त्वरित एक रुपयात पीक विमा काढून घ्या : जिल्हाधिकारी विनय गौडा


- सुविधा केंद्रावर शेतक-यांशी संवाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : राज्य शासनाने शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केवळ एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. मात्र अंतिम मुदतीची वाट न पाहता शेतक-यांनी एक रुपयात त्वरीत पीक विमा काढून घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले.

गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी येथील ग्राम पंचायतीमध्ये असलेल्या सुविधा केंद्रावर शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावर, उपजिल्हाधिकारी स्नेहल रहाटे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नगदेवते, तहसीलदार शुभम बहाकर, उपविभागीय कृषी अधिकारी, गिरीश कुलकर्णी, तालुका कृषी अधिकारी पानसरे तसेच शेतकरी उपस्थित होते.

शासनाने सुरू केलेल्या केवळ एक रुपयात पीक विमा या अभिनव उपक्रमाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, अंतिम तारीख ३१ जुलै असली तरी ऐन वेळी घाई टाळण्यासाठी शेतक-यांनी पुढे यावे. स्वतःच्या मोबाइलद्वारे पीक विमा काढणे सहज शक्य आहे. अन्यथा नजीकच्या बँक, सुविधा केंद्रावर जावे. विविध नैसर्गिक आपत्ती, कीड रोग ई  अशा अनेक कारणांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानी पासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्य शासनाने सन २०२३-२४ मध्ये केवळ एक रुपयात पीक विमा लागू केली आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शेतकरी रामू बालूगवार, गणपती येगगेवार यांना पीक विमा काढून देऊन त्यांच्याकडे सुपूर्त केला.

जिल्ह्यात खरीप हंगामात सुमारे ४ लक्ष ७० हजार ८२७ हेक्टर क्षेत्र कापूस, सोयाबीन, तुर, भात इ . मुख्य पिकांच्या लागवडीखाली असते.  जिल्ह्यातील ३ लक्ष ६१ हजार ७९१ खातेदारांनी  केवळ एक रुपयात पीक विमा काढून घ्यावा. यासाठी ७/१२ उतारा, ८अ, आधार कार्ड, बँक खाते आणी पीक असलेचे स्वयंघोषणापत्र ई कागदपत्र आवश्यक आहे.

ई-पिक पाहणी करून सातबाऱ्यावर पीक पेरा नोंद करा : जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गोंडपिपरी तालुक्यातील मौजा बोरगाव येथे मोबाईल ॲपद्वारे ई-पीक पाहणी करून सातबाऱ्यावर पीक पेरा नोंद करण्यासाठी शेतकऱ्याना आवाहन केले. यावेळी कृषी सहाय्यक आर. डी. निकोडे यांनी जिल्हाधिकारी यांच्या समक्ष शेतकऱ्यांना मोबाईल वर पीक पेरा नोंद करण्याचे प्रात्याक्षिक करून दाखविले. ई- पीक पाहणी मोबाईल ॲपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यांनी तलाठयाकडे न जाता स्वतःच्या मोबाईल वरून आपल्या सातबारावर विविध पिकांची नोंदणी करणे शक्य झाले आहे.

खरीप हंगाम २०२३पीक पाहणी नोंदणी साठी ई- पिक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअर वर उपलब्ध आहे. तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नविन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी १ जुलै २०२३ पासून सुरू झाले आहे. जिल्हयातील शेतक-यांनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीत आपली ई- पिक पाहणी नोंदणी पूर्ण करावी. जेणेकरून शासनाच्या विविध योजनांचा विशेष करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही, असे यावेळी जिल्हाधिका-यांनी सांगितले.





  Print






News - Chandrapur




Related Photos