महत्वाच्या बातम्या

 शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाद्वारे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज व इतर मागासवर्गातील विद्यार्थ्यांसाठी चालविण्यात येणारी शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळेसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली असून चालु सत्रातील वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहे. इच्छुक व पात्र लाभार्थ्यांनी नियोजित वेळेत अर्ज संबंधित सहाय्यक आयुक्त कार्यालयात सादर करावा. 

सन २०२३-२४ सत्रासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावयाचा आहे अशा पात्र विद्यार्थ्यांसाठी ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याच्या कालावधी १२ जुलै असून पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करण्याची मुदत १४ जुलै आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत २३ जुलै असून रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्याची मुदत २६ जुलै आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश २ ऑगस्टपर्यंत देण्यात येईल.

दहावी व अकरावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) आणि बी.ए., बी.कॉम., बी.एस्सी. अशा बारावी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका, पदवी आणि एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका आदी अभ्यासक्रमासाठी (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळुन) ऑफलाईन प्रवेश अर्ज करण्याचा कालावधी 31 जुलै असून पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करण्याची मुदत ७ ऑगस्ट आहे. पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत १७ ऑगस्ट असून रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील गुणवत्तेनुसार निवड यादी प्रसिद्ध करण्याची मुदत २३ ऑगस्ट आहे. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात येणार आहे.

ज्या विद्यार्थी व विद्यार्थीनींना शासकीय वसतिगृहात प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांनी लवकरात लवकर संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून नियोजित वेळेत अर्ज सादर करावा असे आवाहन समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त  डॉ. सिद्धार्थ गायकवाड यांनी केले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos