जिल्ह्यात पाणीटंचाई जाणवणार नाही, यासाठी आतापासूनच प्रयत्न करा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे प्रशासनाला निर्देश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : जिल्ह्यात सध्या थेट दुष्काळसदृश परिस्थिती नसली, तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पावसाच्या तुटीमुळे काही भागांत धान व इतर पिकांना पाण्याची कमतरता भासत आहे. विशेषतः धान पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असल्याने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आतापासूनच पाण्याचे नियोजन व आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री डॉ. भोयर यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, जलाशयांमधील पाणीसाठा, सिंचन व्यवस्था, पिकांची सद्यस्थिती तसेच संभाव्य पाणीटंचाईचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी सावन कुमार, खासदार प्रशांत पडोळे, आमदार राजू कारेमोरे, आमदार डॉ. परिणय फुके, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदासी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता खोब्रागडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
बावनथडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात मोठी घट -
आढावा बैठकीत जिल्ह्यातील जलप्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती चिंताजनक असल्याचे निदर्शनास आले. बावनथडी प्रकल्पातील पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत मोठी घट झाली आहे. गतवर्षी या प्रकल्पात सुमारे ९६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा मात्र हा साठा केवळ ३५ ते ३६ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे शेतीसाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची गरज आहे. धान पिकाला भरपूर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे धान उत्पादक भागात सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन झालेच पाहिजे. पाण्याचा वापर, उपलब्ध साठा आणि आगामी गरज यांचा विचार करून कृषी व पाणीपुरवठा विभागाने समन्वयाने नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
धान पिकावरील किडीच्या प्रादुर्भावाकडे लक्ष द्या -
पावसाच्या तुटीबरोबरच सध्या काही भागांतील धान पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याचेही बैठकीत निदर्शनास आले. याकडे कृषी विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी करावी. किडीचा प्रादुर्भाव असलेल्या भागात तातडीने मार्गदर्शन करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी कृषी विभागाला दिल्या. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष शेतात जाऊन पिकांची सद्यस्थिती जाणून घ्यावी. पाण्याची उपलब्धता, पिकांची वाढ, किडीचा प्रादुर्भाव आणि संभाव्य नुकसान याचा आढावा घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे, असेही त्यांनी सांगितले.
सुरेवाडा प्रकल्पाची कामे मार्गी लावणार -
जिल्ह्यातील सिंचन व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी सुरेवाडा प्रकल्पाची प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले. सिंचनाची उपलब्धता वाढविण्यासोबतच भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पावसाची तूट, जलाशयांमधील घटता पाणीसाठा आणि धान पिकासाठी लागणाऱ्या मोठ्या प्रमाणातील पाण्याची गरज लक्षात घेता शेती व पिण्याच्या पाण्याचे आतापासूनच योग्य नियोजन करावे. तसेच धान पिकावरील किडीच्या प्रादुर्भावाकडे कृषी विभागाने विशेष लक्ष देऊन शेतकऱ्यांना तातडीने मदत व मार्गदर्शन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी संबंधित यंत्रणांना दिले.




Petrol Price




