महत्वाच्या बातम्या

 अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आदिवासी समाजाच्या विकासासाठी शासन विविध प्रकारच्या योजना राबविते. यात विशेषत: शैक्षणिक विकासाच्या अनेक योजनांचा समावेश आहे. या समाजातील विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षण घेता यावे यासाठी परदेश शिष्यवृत्ती ही योजना राबविली जात असून अनेक आदिवासी विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्तीमुळे विदेशी शिक्षणाचे स्वप्न साकारले आहे.


आदिवासी विद्यार्थ्यांना विदेशी शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्याकरीता शिष्यवृत्ती योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकुण 10 विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती देण्यात येते. तथापि दहा विद्यार्थ्यापेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यास विद्यार्थ्यांनी इयत्ता 12 वी पदवी अभ्यासक्रमात मिळविलेल्या गुणाआधारे प्राधान्य दिल्या जाते. 


शासनाने विविध अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्तीचा कोटा ठरवून दिला आहे. त्यानुसार 10 विद्यार्थ्यांमध्ये एमबीए अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तरसाठी 2 जागा, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर 2 जागा, बीटेक (इंजिनिअरींग) अभ्यासक्रमाच्या पदवी व पदव्युत्तर 2, विज्ञान अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर 1, कृषि अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर 1 व इतर विषयाच्या अभ्यासक्रमाच्या पदव्युत्तर 2 जागा याप्रमाणे एकून 10 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. 


या योजनेंतर्गत शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क, भोजन, निवास, प्रवास इत्यादी अनुषंगिक खर्च भागविण्यासाठी सहाय्य केले जाते. शिष्यवृत्तीच्या लाभासाठी विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा, भूमिहीन आदिवासी कुटूंबातील विद्यार्थी, दुर्गम भागातील विद्यार्थी तसेच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाते. विद्यार्थ्याला परदेशातील मान्यताप्राप्त विद्यापीठामध्ये प्रवेश मिळालेला असावा. या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटूंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा कमाल शासनाने विहीत केल्याप्रमाणे असावी. ही शिष्यवृत्ती कुटूंबातील केवळ एकाच व्यक्तीस आणि एका अभ्यासक्रमासाठी अनुज्ञेय आहे.


या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातून विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध होतात. इतर निकष व माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात उपलब्ध आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ही अतिशय उपयुक्त योजना आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी केले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos