भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यातून अमेरिकेला स्फोटके निर्यात केली जाणार


वृत्तसंस्था / पुणे :   भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यातून अमेरिकेला स्फोटके निर्यात केली जाणार आहेत. पुण्यातील उच्च ऊर्जा दारूगोळा निर्मिती कारखान्याकडून अमेरिकेला स्फोटकांची दारू निर्यात केली जाणार आहे. संरक्षण मंत्रालयाचे सचिव (संरक्षण उत्पादन) अजयकुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. 
पुण्यातील खडकी येथे उच्च ऊर्जा दारूगोळा निर्मिती कारखाना आहे. 'एचई फॅक्टरी' नावाने ही फॅक्टरी ओळखली जाते. अतिशय संवेदनशील दारूगोळ्याची निर्मिती येथे केली जाते. या फॅक्टरीतून 'टीएनटी' (ट्रायनायट्रोटोलिन) व 'डीएनटी' (डायनायट्रोटोलिन) या स्फोटक दारूची अमेरिकेला निर्यात केली जाणार आहे. ॲम्युनिशन फॅक्टरी बोर्डाचे अध्यक्ष सौरभ राव यांच्यासह अमेरिकेच्या पथकाने गुरुवारी एचई फॅक्टरीला भेट दिली. या पूर्वीही पथकाने फॅक्टरीला भेट दिली होती. त्यानंतर फॅक्टरीमधून स्फोटक दारू अमेरिकेला निर्यात करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
टीएनटी व डीएनटी या दोन्ही पावडर स्फोटकांची निर्मिती करण्यासाठी वापरले जाते. त्याची निर्मिती एचईमध्ये होते. यापैकी टीएनटी ही पेस्ट स्वरूपात असते. घर्षण होऊ नये, यासाठी त्यात स्पिरिट मिसळलेले असते. प्रत्यक्षात स्फोटक निर्मितीवेळी ही पेस्ट वाळवून त्याचा वापर केला जातो. 
दरम्यान, 'एचई फॅक्टरीसह अन्य दारूगोळा निर्मिती कारखान्यांना बाहेरील कामे मिळावीत, यासाठी भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ प्रयत्नशील असून, संघ या निर्णयाचे स्वागत करत आहे,' असे संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सागर जोशी यांनी सांगितले. 
'या दोन्ही पावडर तयार करताना त्यातून अत्यंत घातक असे प्रदूषणकारी घटक (रेड वॉटर) तयार होते. मात्र, 'एचई फॅक्टरी'ने त्यावर प्रक्रिया करण्यासाठी खास केंद्र उभारले आहे. विशिष्ट प्रक्रियेनंतर या रेड वॉटरमधील घातक पदार्थ वेगळे काढले जातात व त्याद्वारे बागकाम व इतर कामांसाठी वापरता येईल, इतपत शुद्ध पाणी बाहेर पडते. या प्रक्रिया केंद्राची पाहणी केल्यानंतरच अमेरिकेने या कराराला मान्यता दिली आहे,' अशी माहिती सूत्रांनी दिली. 
'संरक्षण मंत्रालय सुमारे ५००० कोटी रुपयांच्या संरक्षण उत्पादनांची खरेदी करते. पूर्वी संरक्षण उत्पादन खरेदीची प्रक्रिया किचकट व वेळखाऊ होती. आता त्यात खूप बदल झाले असून, ही प्रक्रिया सुटसुटीत झाली आहे. त्यामुळे 'दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' अर्थात डिक्कीच्या सभासदांनी त्याचा फायदा घ्यावा,' असे आवाहन संरक्षण मंत्रालयाच्या उत्पादन विभागाचे सचिव अजयकुमार यांनी केले. संरक्षण मंत्रालय, डिक्की व एनएसआयसीच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व जमातीच्या उद्योजकांसाठी संरक्षण उत्पादन संदर्भात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डिक्कीचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद कांबळे, डिक्कीचे पश्चिम भारत अध्यक्ष निश्चय शेळके, प्रदेश अध्यक्ष अविनाश जगताप, अवजड उद्योग विभागाचे प्रमुख अनिल होवाळे उपस्थित होते. बदललेल्या संरक्षण खरेदी प्रक्रियेची माहिती उपस्थितांना देत अजयकुमार यांनी डिक्कीने संरक्षण उत्पादन क्षेत्रात येत्या काळात एक हजार उद्योजक घडवावेत, असे आवाहनही केले.   Print


News - World | Posted : 2019-02-09


Related Photos