महत्वाच्या बातम्या

 चार वर्षांत रस्ते अपघाताचे तब्बल साडेदहा हजार बळी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : राज्यात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांबरोबरच रस्ते अपघातांच्याही घटना वाढल्या आहेत.
या अपघातांमध्ये रस्त्यावरून चालताना प्राण गमावलेल्या पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. २०१९ ते २०२२ या चार वर्षांत १० हजार ६१७ पादचारी रस्ते अपघातांचे बळी ठरले आहेत.
देशाबरोबरच राज्यातील रस्ते पादचाऱ्यांसाठी प्राणघातक ठरत आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी विविध उपायोजना करूनही रस्ते अपघातातील मृत्यूंचे प्रमाण कमी झालेले नाही. महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात २०१९ ते २०२२ या चार वर्षांमध्ये एकूण १० हजार ६१७ पादचाऱ्यांना अपघातात प्राण गमवावे लागले. २०१९ मध्ये दोन हजार ८४९ पादचाऱ्यांचा मृत्यू झाला, तर २०२२ मध्ये यात वाढ होऊन दोन हजार ९८४ पादचाऱ्यांनी जीव गमावला आहे. रस्त्यांची रचना पादचारीपूरक असावी.


रस्ते प्रशस्त; परंतु धोकादायक : 
- राज्यात काही ठिकाणी रस्ते प्रशस्त आहेत; परंतु ते ओलांडण्याच्या दृष्टीने धोकादायक आहेत. त्यामुळे वेगवाने येणारी वाहने चुकवीत जीव मुठीत घेऊन पादचाऱ्यांना रस्ता ओलांडावा लागतो.
- मोकळ्या रस्त्यावर, महामार्गावर वाहनचालक वेगाने वाहने चालवितात. त्यामुळे महामार्गाच्या आजूबाजूला असलेल्या गावांमध्ये, शहरांमधील नागरिकांना रस्त्यावरून चालता येत नाही. काही अपघातांमध्ये पादचाऱ्यांचा निष्काळजीपणाही त्यांच्या जिवावर बेततो.


स्कायवॉक, सब-वेचा वापर कमीच : 
फेरीवाले, रस्त्याच्या कडेला पार्क केलेली वाहने यामुळे पादचाऱ्यांना चालण्यास जागाच शिल्लक राहात नाही. पादचाऱ्यांना सुरक्षितपणे रस्ता ओलांडता यावा, यासाठी मोठ्या शहरांमध्ये स्कायवॉक आणि सब-वे बांधण्यात आले; मात्र त्यांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी आहे.


निष्काळजीपणा नको : 
अपघाती मृत्यूमध्ये पादचाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे. पादचाऱ्यांनी चालताना नेहमी उजव्या बाजूने चालावे, रस्ता ओलांडताना दक्ष असावे. पादचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांच्या जिवावर बेतू शकते.





  Print






News - Rajy




Related Photos