महत्वाच्या बातम्या

 वर्ध्यातील बड्या बँकेवर सायबर हल्ला : कोट्यवधीची रक्कम गायब


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : वर्ध्यातील एका बँकेवर सायबर हल्ला झाला असून, हल्लेखोरांनी तासाभरात कोट्यवधीची रक्कम वेगवेगळ्या खात्यावर वळती करून घेतली आहे.

वर्ध्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येस बॅंकेची युटिलीटी हॅक करुन बॅंकेत असलेल्या वर्धा नागरी सहकारी अधिकोष बॅंकेच्या खात्यातून सायबर चोरट्याने तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजार रुपयांची रक्कम विविध खात्यात परस्पर ऑनलाईन पद्धतीने वळती करुन घेतली आहे. या सायबर हल्ल्याप्रकरणात वर्धा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती सायबर सेलकडून देण्यात आली आहे.

आरटीजीएस सुविधेसाठी बँक खाते

आरटीजीएस व नेफ्ट सुविधा देण्यासाठी येस बॅंक प्रायव्हेट लिमिटेड ही वर्धा नागरी बॅंकेशी संलग्न बॅंक आहे. येस बॅंकेत वर्धा नागरी बॅंकेचे खाते आहे. त्या खात्यातून आरटीजीएस आणि नेफ्टचे व्यवहार होत असतात. २४ मे रोजी बुधवारी बॅंक बंद असताना पहाटे ६ ते सकाळी ८ या वेळेत येस बॅंकेची युटिलीटी सायबर चोरट्याने हॅक केली. यामध्ये वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातून तब्बल १ कोटी २१ लाख १६ हजारांची रक्कम विविध खात्यात वळती करण्यात आली. सकाळी बॅंक उघडल्यावर सर्व संगणक सुरु करुन तपासणी केली असता कर्मचाऱ्यांना ही बाब लक्षात आली.

सायबर सेलकडून तपास सुरू

बॅंकेच्या सर्व सिस्टीम बंद असताना २४ मे रोजी पहाटेच्या सुमारास बँकेच्या खात्यावर सायबर हल्ला झाला. सायबर सेलकडून तपास सुरु झालेला आहे. रिजर्व्ह बॅंकेला याबाबत अवगत करण्यात आलेले आहे. बॅंकेतील कर्मचारी बॅंकेत आल्यावर त्यांना येस बॅंकेत असलेल्या खात्यावर सायबर हल्ला झाल्याचे आढळून आले. त्यानंतर तत्काळ वर्धा नागरी बॅंकेच्या खात्यातील रक्कम ज्या ज्या बॅंकेत वळती झालेली आहे ती सर्व खाती बँकेकडून ब्लॉक करण्यात आली आहेत.





  Print






News - Wardha




Related Photos