महत्वाच्या बातम्या

 शेती आमची, अधिकारही आमचा, सण फ्लॅग आयर्न स्टील कोल लिमिटेडविरोधात पोळ्यातून शेतकऱ्यांचा एल्गार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : तालुक्यातील नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनी सण फ्लॅग आयर्न स्टील कोल लिमिटेडविरोधात तीव्र विरोध व्यक्त करीत बैल पोळा सणाला आंदोलनाचे स्वरूप दिले. शेती, जमीन आणि गावाच्या अधिकारांवर कोणत्याही प्रकारे गदा आणली जाऊ नये, या भूमिकेतून शेतकऱ्यांनी सजविलेल्या बैलजोड्यांच्या माध्यमातून कंपनीविरोधात आपला संताप व्यक्त केला.

पोळा हा शेतकरी आणि बैलांच्या नात्याचा सण मानला जातो. याच पारंपरिक सणाच्या माध्यमातून नांदगाव-पोदे परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतीच्या हक्काचा मुद्दा ठळकपणे मांडला. बैलजोड्यांना सजवून त्यांच्या अंगावर तसेच परिसरात कंपनीविरोधातील संदेश प्रदर्शित करण्यात आले. यावेळी शेती आमची, कोणाच्या बापाची नाही, गाव आमचा, अधिकार आमचा आणि जय जवान, जय किसान अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी विरोध नोंदविला.

सण फ्लॅग आयर्न स्टील कोल लिमिटेडच्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, आपल्या शेती व गावाच्या भवितव्याबाबत शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पारंपरिक पोळ्याच्या उत्सवाला विरोध प्रदर्शनाची जोड देत शेतकऱ्यांनी आपल्या भावना प्रशासन आणि संबंधित कंपनीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला.

शेतजमीन ही केवळ उपजीविकेचे साधन नसून आमच्या कुटुंबाच्या अस्तित्वाचा आधार आहे. गावाच्या हिताला बाधा पोहोचविणारा कोणताही निर्णय स्वीकारला जाणार नाही, अशी भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

दरम्यान, पोळ्यासारख्या पारंपरिक आणि भावनिक सणाच्या माध्यमातून कंपनीविरोधातील शेतकऱ्यांचा असंतोष उघडपणे समोर आल्याने नांदगाव पोडे परिसरातील जमीन व प्रकल्पाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या मागण्या व आक्षेप गांभीर्याने घेऊन त्यांच्याशी संवाद साधावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos