महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूर शहरात तीव्र उष्णतेची लाट : आयुक्तांद्वारे उष्माघात कृती आराखड्याचा आढावा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरात उष्णतेची लाट सुरु असुन तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पार झाले आहे व सातत्याने वाढत आहे. तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर उष्माघात कृती आराखड्याचा आढावा आयुक्त तथा प्रशासक विपीन पालीवाल यांच्याद्वारे घेण्यात आला.  
उष्माघाताचा विशेष धोका हा ५ वर्षापेक्षा कमी असलेल्या लहान मुलांना व ६५ वर्षावरील असलेल्या नागरीकांना तसेच उन्हात काम करणारे मजूर, प्राणी, अल्कोहोल, धूम्रपान करणारे, शुगर, डायबिटिजचे रुग्ण यांना विशेषतः असतो. अस्वस्थपणा, थकवा येणे, शरीर तापणे, अशक्तपणा, अंगदुखी, डोकेदुखी, अतिसार, भारी घाम येणे, मळमळणे, फिकट त्वचा, हृदयाचे ठोके जलद होतात,पोटाच्या वेदना ही उष्माघाताची लक्षणे आहेत.


उष्माघातापासुन संरक्षणासाठी भरपूर पाणी प्यावे, थंड पेये - ताक, आंब्याचे पन्हे, नारळ पाणी प्यावे, अत्यावश्यक असल्याशिवाय उन्हात जाऊ नये, सैल व फिकट रंगाचे कपडे घालावेत, थंड जागेत, वातावरणात राहावे तसेच भर उन्हात म्हणजे साधारणतः दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत उन्हात जाणे टाळावे. विना चप्पल बाहेर जाऊ नये,लहान मुलांना तसेच प्राण्यांना कारमध्ये बंद करून जाऊ नये.  थंडगार पाण्याने अंघोळ करावी. ( डोक्यावरून गार पाण्याने अंघोळ केल्याने तापलेले शरीर थंड होण्यास मदत होते ) थंड जागेत आराम करावा, परिश्रमाचे काम करू नये, भरपूर थंड पाणी प्यावे, तसेच मनपा आरोग्य केंद्रात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात त्वरित औषधोपचार करवून घ्यावा.  


याप्रसंगी आरोग्य विभागास अत्यावश्यक प्रसंगी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच उष्माघातापासुन संरक्षण कसे करावे याची माहीती विविध माध्यमांद्वारे कधीकधी नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील,वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. वनिता गर्गेलवार, डॉ. जयश्री वाडे, डॉ. विजया खेरा, डॉ. अश्विनी भारत, डॉ. योगेश्वरी गाडगे, डॉ. शरयु गावंडे, डॉ.आरवा लाहिरी, डॉ. नरेंद्र जनबंधू डॉ. अतुल चटकी उपस्थीत होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos