गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एटापल्ली शहरातून पोलिसांचा रूट मार्च


- प्रमुख व संवेदनशील मार्गांवर पोलिसांचे संचलन; कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा सज्ज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली : आगामी गणेशोत्सव सण शांततेत, सुरक्षित वातावरणात आणि उत्साहात पार पडावा, तसेच सण-उत्सवाच्या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी एटापल्ली पोलिस दलाच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी शहरातून रूट मार्च काढण्यात आला. पोलिसांच्या या संचलनातून शहरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या समाजकंटकांना स्पष्ट संदेश देण्यात आला.
एटापल्ली पोलीस स्टेशन येथून रूट मार्चला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राजीव गांधी चौक, मुख्य बस स्टॉप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, संस्कार पब्लिक स्कूल परिसर, इंदिरा वॉर्ड आणि मशीद रोड यांसह शहरातील प्रमुख तसेच संवेदनशील मार्गांवरून पोलिसांचे शिस्तबद्ध संचलन करण्यात आले. शहरातील महत्त्वाच्या भागांतून रूट मार्च काढून पोलिसांनी परिस्थितीचा आढावाही घेतला.
या रूट मार्चचे प्रत्यक्ष नेतृत्व उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बर्गे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास बेले, पोलीस उपनिरीक्षक पायघन, पोलीस उपनिरीक्षक सुर्वेसे आणि महिला पोलीस उपनिरीक्षक शिरशिकर यांनी केले.
या संचलनात एटापल्ली पोलीस स्टेशनचे २१ पोलीस अंमलदार, शीघ्र कृती दलाचे ८ जवान तसेच राज्य राखीव पोलीस बलाचे ८ जवान सहभागी झाले होते. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील मार्गांवर पोलिसांची उपस्थिती दिसून आली.
गणेशोत्सवाच्या काळात विविध गणेश मंडळांकडून धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच गणेश विसर्जनाच्या वेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याने कायदा व सुव्यवस्था, वाहतूक नियंत्रण आणि नागरिकांची सुरक्षितता यांना विशेष महत्त्व असते.
या पार्श्वभूमीवर एटापल्ली पोलिसांनी रूट मार्चच्या माध्यमातून सुरक्षा व्यवस्थेची पूर्वतयारी केली आहे. एसडीपीओ संतोष बर्गे यांनी सण-उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस जवानांनी सतर्क राहावे, अशा सूचना दिल्या. गणेशोत्सव शांततेत, सौहार्दपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी नागरिकांनीही पोलिस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.




Petrol Price




