‘त्या’ तिघांवर ताडगावातच केले अंत्यसंस्कार


- आजही कसनासूर वासीय ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या पटांगणावरच
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
काल २२ जानेवारी रोजी नक्षल्यांनी हत्या केलेल्या कसनासूर येथील त्या तिघांच्या पार्थिवावर अखेर ताडगावातच  अंत्यसंस्कार करण्यात आले. तसेच आजही कसनासूर येथील नागरीक ताडगाव पोलिस मदत केंद्राच्या आवारातच वास्तव्याने आहेत. यामुळे नक्षल्यांची दहशत कायम असल्याचे दिसून येत आहे.
नक्षल्यांनी कसनासूर येथील २२ एप्रिलच्या चकमकीला जबाबदार धरून पोलिस खबरी असल्याच्या संशयातून महालु दोगे मडावी, कन्ना रैनु मडावी, लालसू मासा कुडयेटी या तिघांची हत्या केली. त्यांचे मृतदेह कोसफुंडी फाट्याजवळ रस्त्यावर टाकून दिले. गावातील काही जणांचे अपहरणसुध्दा नक्षल्यांनी केले. यामुळे संपूर्ण गाव दहशतील होते. नागरीक ताडगाव पोेलिस मदत केंद्रात आश्रयास आहेत. या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी मिलिंद मेश्राम आणि त्यांच्या चमूने आरोग्य तपासणी केली. नक्षल्यांनी अपहरण करून सोडलेल्या तिघांची सुद्धा तपासणी करण्यात आली. 
शवविच्छेदनानंतर प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र गावातील नागरीकांनी कसनासूर येथे न जाण्याचा निर्णय घेत ताडगावमध्येच अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. कसनासूर वासीयांची व्यवस्था पोलिस मदत केंद्राच्या आवारात करण्यात आली आहे. या ठिकाणीच स्वयंपाक बनवून जेवनाची तसेच झोपण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पोलिस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी दाबाडे सहकार्य करीत आहेत.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-23


Related Photos