महत्वाच्या बातम्या

 महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्य जिल्हा परिषदेत ध्वजारोहन


- उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार

-  जिल्ह्यातील शाळांच्या मुख्याध्यापकांचा गौरव

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६३ व्या वर्धापनदिननिमित्य जिल्हा परिषद प्रांगणात मुख्य कार्य अधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचा सिंधुताई सपकाळ सभागृहात सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, डॉ. ज्ञानदा फणसे व सर्व खाते प्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. पर्यवेक्षकीय व तांत्रिक कर्मचाऱ्यांचा सत्कार होतो, कार्यालयामध्ये काम करतात त्यांचाही सत्कार व्हावा यासाठी यावर्षीपासून पुरस्कार देण्याच्या उपक्रम सुरु केला आहे. पुरस्काराची व्याप्ती वाढवून शक्य तेवढ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांचा पुढील महाराष्ट्र दिनाच्या दिवशी उत्कृष्ट कामासाठी सत्कार करण्यात येईल. कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन तसेच जनता व ग्रामस्थांची कामे गतीने आणि वेळेत करून पुरस्काराकरीता आपली निवड होईल यादृष्टीने प्रयत्न करावे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्यालयातील सन २०२२-२३ मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या २५ कर्मचाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांना मुख्य कार्य अधिकारी रोहन घुगे यांच्याहस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ग्राम सामाजिक परिवर्तन अंतर्गत आदर्श शाळा विकास कार्यक्रमामध्ये सन २०२१-२२ मधे उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गिरोली, भिडी, सालधरा व काचनूर येथील शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकेतून हा उपक्रम प्रथमच मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे. यावर्षी फक्त सहा संवर्गाकरिता उपक्रम राबविला असून यापुढे व्याप्ती वाढवून इतरही संवर्गाचा पुढील वर्षीपासून विचार करण्यात येईल, असे सांगितले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड यांनी कार्यालयातील कर्मचारी कामे करतात परंतु त्यांचे काम दिसून येत नसल्यामुळे त्यांचा सत्कार होत नाही. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून यावर्षी सुरू केलेल्या उपक्रमामुळे निश्चितच कर्मचाऱ्यांना काम करण्याची प्रेरणा व जिद्द मिळेल, असे सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos