भाजी तोडल्याच्या रागातून इसमाचा खून


धोत्रा (रेल्वे) गावात घटनेने खळबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा :
शेतातून भाजीपाला का तोडला या कारणातून इसमाचा चक्क खून केल्याची  घटना धोत्रा (रेल्वे) गावात आज १५ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. या घटनेने गावात एकच खळबळ उडाली होती.
अरविंद शिवराम चावरे (वय ३०) रा. धोत्रा (रेल्वे) असे मृत इसमाचे नाव आहे.  अरविंद शिवराम चावरे हे चौधरी नामक व्यक्तीच्या शेतशिवारात झोपून असताना  तेथे मुरलीधर श्यामराव थोरात रा. धोत्रा (रेल्वे) हा आला व त्याने अरविंद चावरे याच्याशी वाद करणे सुरु केले. तु शेतातून भाजीपाला तोडून कां आणला  असे म्हणत शाब्दीक वाद केला. काहीवेळ दोघांमध्ये वाद सुरु होता. पण, संतापलेल्या मुरलीधर थोरात याने हातात असलेल्या लाकडी दांड्याने अरविंद  चावरे याच्या डोक्यावर वार केला. एकाच वारात अरविंद चावरे खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती अरविंद चावरे यांची  पत्नी नाजुका अरविंद चावरे यांनी सावंगी पोलिसात दिली. सावंगी पोलिस ठाण्याचे ठाणेदार दत्तात्रय गुरव, पोलिस उपनिरीक्षक सासकर, शंभरकर,  स्वप्नील मोरे, नवनाथ मुंडे, बिसने, लोंबेकर, प्रकाश नागपूरे हे  घटनास्थळी पोहचले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तेथील नागरिकांचे बयाण नोंदविले. आणि मृतदेह उत्तरिय तपासणीकरीता वर्धा येथील सामान्य  रुग्णालयात पाठवला. पोलिस आरोपी मुरलीधर थोरात याचा शोध घेत असून पुढील तपास ठाणेदार गुरव यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.   Print


News - Wardha | Posted : 2019-01-15


Related Photos