आपले कार्य येणारा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी असावे : ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम


- १९ व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचा समारोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा :
प्रत्येक बाल - युवा मन सुदृढ राहण्यासाठी खेळांची व त्यासोबतच त्यांच्या आंतरिक कलागुणांना वाव देण्याची नितांत आवश्यकता आहे. कारण सुदृढ मन आणि मनगट हेच  येणार सुदृढ भारत घडविणार आहे.  त्यासाठी स्काऊट गाईड सारख्या प्रशिक्षणाची आवश्यकता मोठ्या प्रमाणात आहे. आजचे युवा हेच उद्याचे भविष्य आहे त्यामुळे आपले कार्य हे येणारा उज्ज्वल भविष्यकाळ घडविण्यासाठी असावे. 
आपल्या जिल्ह्यात अश्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही स्वरूपाची मदत हवी असल्यास मला सांगा. त्यासाठी मी सदैव तत्पर असेल, असे प्रतिपादन आदिवासी विकास व वने राज्यमंत्री तथा गडचिरोली  जिल्ह्याचे पालकमंत्री ना राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. 
 राजे धर्मराव हायस्कुल, मूलचेरा येथे ३ ते ६ जानेवारी दरम्यान ४ दिवसीय १९ व्या स्काऊट गाईड जिल्हा मेळाव्याचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम   ना. राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते  उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.  याप्रसंगी ते बोलत होते.  
स्काऊट गाईडच्या शिबिराकरिता आलेल्या प्रशिक्षणार्थी मुलांकडून सादर करण्यात आलेल्या विविध विषयांवरील सामाजिक संदेश देणाऱ्या अप्रतिम झाकींच्या प्रस्तुतिकरणाने कार्यक्रमाला सुशोभित केले. यावेळी मराठी पत्रकार सृष्टीचे 'दर्पण' कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून साजरा करण्यात येणाऱ्या 'पत्रकार' दिनानिमित्त स्थानिक पत्रकारांचा पालकमंत्र्यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. 
  पुढे बोलताना ना आत्राम  म्हणाले, आजची पिढी ही अधिक सजग व जागरूक आहे. पण त्याच्या जोडीला त्यांच्यात प्रगल्भता पाहिजे. जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये हे प्रशिक्षण देण्यात यावे यासाठी मी प्रयत्नरत राहील.   प्रशिक्षणार्थी मुलांकडून सादर करण्यात आलेल्या सामाजिक संदेशपर झाकींच्या प्रस्तुतिकरणातून येथे करण्यात येणाऱ्या संस्कारपूर्ण समाज प्रबोधनाची महती व माहिती पुनः अनुभवता आली. असे प्रतिपादन करत ना. आत्राम यांनी उपस्थितांशी संवाद साधला. 
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सुरेश सावकार पोरेड्डीवार, पं. स. सभापती सुवर्णा येमुलवार, जिल्हा स्काऊट गाईड कमिशनर भोसले  , स्काऊट गाईडच्या पोरेड्डीवार  , सरपंच ममता बिस्वास, रमेश नागोसे, सुभाष गणपती, जिल्ह्यातील स्काऊट गाईड शिक्षक, प्रशिक्षणार्थी विद्यार्थी तथा मोठ्या प्रमाणात गावकरी उपस्थित होते. प्रास्ताविक अजय लोंढे यांनी केले.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-01-08


Related Photos