१५ ते १८ जानेवारीदरम्यान गोंडवाना विद्यापीठात आविष्कार २०१८ चे आयोजन


- राज्यातील २० विद्यापीठातील एक हजार विद्यार्थी सहभागी होणार
- कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांची पत्रकार परिषदेतून माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
विद्यार्थ्यांच्या संशोधनात्मक वृत्तीला चालना मिळण्यासाठी व संशोधनात्मक दृष्टीकोण विकसीत होण्याकरीता, युवकांना व्यासपीठ मिळण्याकरीता १३ वे महाराष्ट्र आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सव आविष्कार २०१८ चे आयोजन यावर्षी गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठात १५ ते १८ जानेवारी २०१९ दरम्यान करण्यात आले आहे. या महोत्सवात राज्यातील २० विविध विद्यापीठातील १ हजार विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे.
पत्रकार परिषदेला कुलसचिव डाॅ. ईश्वर मोहुर्ले, परीक्षा व मुल्यमापन समितीचे संचालक डाॅ. अनिल चिताडे, आविष्कार च्या संयोजिका, प्रभारी संचालक डाॅ. प्रिया गेडाम, रासेयोचे प्रभारी संचालक डाॅ. नरेश मडावी, प्रसिध्दी प्रमुख डाॅ. विनायक शिंदे उपस्थित होते.
पुढे माहिती देताना डाॅ. कल्याणकर म्हणाले, राज्यपाल तथा कुलपती यांच्या कार्यालयाद्वारे प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवाचे आयोजन विद्यापीठांमार्फत केले जाते. यावर्षीचे १३ वे महोत्सव गडचिरोली येथे आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. या आविष्कार मध्ये एक हजार विद्यार्थी व संशोधक प्राध्यापक सहभागी होणार आहेत. संशोधन महोत्सवात ह्युमॅनिटीज, लॅंग्वेज, फाईन आर्ट, काॅमर्स, मॅनेजमेंट, लाॅ, प्युअर सायन्स, ऍग्रीकल्चर अँड ऍनिमल हॅसबॅडी, इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजी, मेडीसीन अँड  फाॅर्मसी या क्षेत्रातील प्रदर्शन होणार आहे. 
१५ जानेवारी रोजी कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली महोत्सवाचे उद्घाटन होईल. ऑटोमिक एनर्जी कमीशन अँड सेक्रेटरी डिपार्टमेंट ऑफ ऑटोमिक एनर्जी भारत सरकारचे अध्यक्ष के.एन. व्यास, रेक्टर डिझाईन अँड  डेव्हलपमेंट गृप चे असोसिएट डायरेक्टर पी. आर. पाटील आणि , भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर व विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डाॅ. सी.व्ही. भुसारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 
१६ जानेवारी रोजी सकाळी ९  ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत पोस्टर प्रेसेंटेशन व माॅडेल एक्झीबिशन होणार असून १७ जानेवारी रोजी आय.ए.एस. मिता राजीवलोचन मार्गदर्शन करणार आहेत. १८ जानेवारी रोजी कुलगुरू डाॅ. कल्याणकर यांच्या अध्यक्षतेखाली डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोलाचे कुलगुरू डाॅ. व्ही.एस. भाले व प्रभारी कुलगुरू डाॅ. सी.व्ही. भुसारी यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षिस वितरण होणार आहे.
या महोत्सवासाठी १ कोटी २० लाखांच्या आर्थिक तरतूदीला राज्यपालांनी मान्यता दिली आहे. प्रथमच गोंडवाना विद्यापीठात अशा भव्य महोत्सवाचे आयोजन होत असल्यामुळे परिसरातील विद्यार्थ्यांना फायदेशिर ठरणार आहे. या माध्यमातून संशोधकांना भविष्यात दालन उपलब्ध होईल, असेही कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर म्हणाले.  

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-28


Related Photos