महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटरमधून जलसंधारणाचा जागर


- इंदिरा गांधी चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत जनजागृती रॅली; पाणी अडवा, पाणी जिरव चा संदेश

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी /गडचिरोली : माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त २१ ऑगस्ट रोजी राज्यभर जलसंधारण दिन साजरा करण्यात आला. जलसंधारणाच्या क्षेत्रात स्व. सुधाकरराव नाईक यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याला अभिवादन करण्यासोबतच मृद व जलसंवर्धनाचे महत्त्व सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून गडचिरोली शहरात महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर चे आयोजन करण्यात आले. पाणी आणि मातीचे संवर्धन ही काळाची गरज असून, जलसंधारणाचा संदेश केवळ शासकीय यंत्रणांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक नागरिकाच्या मनात रुजावा, या उद्देशाने वॉकेथॉनच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली.

इंदिरा गांधी चौक ते जिल्हा स्टेडियमपर्यंत वॉकेथॉन -
गडचिरोली शहरातील इंदिरा गांधी चौक ते जिल्हा स्टेडियम या मार्गावर वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले. जलसंधारणाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश देत सहभागी या जनजागृती उपक्रमात सहभागी झाले. Save Soil, Save Water, Secure Tomorrow आणि पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा या घोषवाक्यांतून माती व पाण्याच्या संवर्धनाचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवून तो जमिनीत जिरविणे, पाण्याची काटकसरीने वापर करणे आणि नैसर्गिक जलस्रोतांचे संरक्षण करणे याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह -
राज्यभरात १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात आला. या सप्ताहाच्या माध्यमातून मृदसंवर्धन, जलसंवर्धन, पाणी बचत, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि भूजल पातळी वाढविण्याच्या उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली.गडचिरोली जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी पावसाचे पाणी योग्य प्रकारे अडवून त्याचा साठा व भूजल पुनर्भरणासाठी उपयोग करणे आवश्यक आहे. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी विविध जलसंधारणाच्या उपाययोजनांच्या माध्यमातून अडविल्यास भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यास मदत होऊ शकते. त्यासाठी शासनाच्या प्रयत्नांसोबतच लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आले.

जलसंधारण प्रत्येकाची जबाबदारी - 
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे, हा महत्त्वपूर्ण संदेश वॉकेथॉनच्या माध्यमातून देण्यात आला. घरगुती पाण्याचा काटकसरीने वापर करणे, पावसाचे पाणी साठविणे, जलस्रोतांचे प्रदूषण रोखणे, वृक्षसंवर्धन करणे आणि मातीची धूप थांबविणे यासाठी नागरिकांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. हवामानातील बदल, अनियमित पर्जन्यमान आणि वाढती पाण्याची गरज लक्षात घेता भविष्यातील पिढ्यांसाठी आजपासूनच जलसंधारणाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. जलसंधारणाची चळवळ व्यापक करण्यासाठी प्रत्येक कुटुंब, शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकाने आपल्या परीने योगदान देणे गरजेचे आहे.

पाणी आहे तरच भविष्य आहे - 
जलसंधारण दिनानिमित्त आयोजित महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर मुळे गडचिरोली शहरात जलसंधारणाचा जागर करण्यात आला. पाणी आहे तरच भविष्य आहे. प्रत्येक थेंब वाचवूया, गडचिरोलीला जलसमृद्ध बनवूया हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.पाण्याचा प्रत्येक थेंब अमूल्य असून, आज केलेले जलसंवर्धनच उद्याच्या पिढीचे भविष्य सुरक्षित करू शकते. त्यामुळे जल वाचवा, माती वाचवा आणि भविष्य सुरक्षित करा या संकल्पनेला लोकचळवळीचे स्वरूप देण्याचे आवाहन करण्यात आले. जलसंधारण दिनानिमित्त झालेल्या या वॉकेथॉनने केवळ जनजागृतीचा संदेश दिला नाही, तर पाणी बचत आणि मृदसंवर्धनासाठी प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. गडचिरोलीला जलसमृद्ध बनविण्यासाठी शासनासोबत नागरिकांचा सक्रिय सहभागच या प्रयत्नांना अधिक बळ देणार आहे.





  Print






Related Photos