वसतिगृहात अस्वच्छतेचा कळस : सडका भाजीपाला, घाणीचे साम्राज्य


- सिरोंचा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील भोजन व्यवस्थेचा धक्कादायक कारभार उघड; अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी विकास विभागाच्या सिरोंचा येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील भोजन व्यवस्थेचा धक्कादायक कारभार अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणीत उघडकीस आला आहे. शुक्रवार, २१ ऑगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने वसतिगृहातील किचन व स्टोअर रूमची पाहणी केली असता अस्वच्छता, सडलेला भाजीपाला, घाणीचे साम्राज्य आणि दुर्गंधीचे चित्र दिसून आले. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या भोजनाचे कंत्राट असलेल्या अहेरी येथील कंत्राटदाराकडे एफएसएसएआय नोंदणी नसल्याचेही तपासणीत समोर आले आहे.
सिरोंचा येथील हे वसतिगृह एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, अहेरी अंतर्गत येते. आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि पौष्टिक भोजन मिळणे अपेक्षित असताना भोजन तयार करण्याच्या ठिकाणीच स्वच्छतेचा अभाव आढळल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
सडका भाजीपाला अन् दुर्गंधी -
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी वसतिगृहातील मेस, किचन आणि स्टोअर रूमची पाहणी केली. यावेळी मेसमध्ये अस्वच्छता आणि परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आढळून आली. पत्ता कोबी, भोपळा (कोहळा) आणि कांदे सडलेल्या अवस्थेत ठेवण्यात आले होते. सडलेल्या भाजीपाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी वापरला जाणारा भाजीपाला योग्य पद्धतीने साठवला जात नसल्याचे या पाहणीतून समोर आले. अशा परिस्थितीत सडका भाजीपाला भोजनासाठी वापरला जाण्याची शक्यता निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
भोजन कंत्राटदाराकडे एफएसएसएआय नोंदणीच नाही -
तपासणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब उघडकीस आली. विद्यार्थ्यांच्या भोजनाचे कंत्राट असलेल्या अहेरीतील कंत्राटदाराकडे एफएसएसएआय नोंदणी नसल्याचे आढळून आले. भोजन पुरवठ्याची जबाबदारी देताना संबंधित कंत्राटदाराची आवश्यक नोंदणी आणि कागदपत्रांची तपासणी झाली होती का, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या भोजनाशी संबंधित कंत्राटदाराने अन्नसुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असताना नोंदणी नसल्याची बाब समोर आल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
खिडकीतून माकडांचा स्वयंपाकघरात प्रवेश -
तपासणीदरम्यान वसतिगृहातील किचन व्यवस्थेतील आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. किचन रूमच्या खिडकीतून माकडे थेट स्वयंपाकघरात प्रवेश करत असल्याची माहिती तपासणीदरम्यान समोर आली. अन्नपदार्थ तयार केले जाणाऱ्या ठिकाणी माकडांचा मुक्त प्रवेश होत असल्यास अन्नपदार्थ दूषित होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे किचनच्या खिडक्यांना सुरक्षित जाळी अथवा अन्य प्रतिबंधक व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. याशिवाय, पाण्याचे नळ असलेल्या ठिकाणी भाताच्या शितांचा सडा पडलेला आढळून आला. या सर्व बाबींमुळे अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन होत नसल्याचे स्पष्ट झाले.
अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस -
अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी अहवालाच्या आधारे अहेरीचे प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी अमर राऊत यांनी वसतिगृहाचे अधीक्षक प्रणय श्यामकुंवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
अधीक्षकांकडून या प्रकरणी खुलासा मागविण्यात आला असून, खुलासा प्राप्त झाल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, वसतिगृहातील अस्वच्छता आणि यंत्रणेचा हलगर्जीपणा ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
अन्न विभागाच्या पथकाकडून तपासणी -
ही तपासणी सहायक आयुक्त (अन्न) गिरीश ताटकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम आणि नमुना सहायक तुकाराम गोळे यांनी केली. तपासणीदरम्यान आढळलेल्या त्रुटींची नोंद घेण्यात आली असून, अन्न सुरक्षा अधिकारी सुरेश तोरेम यांनी तपासणीचा सविस्तर अहवाल अहेरी प्रकल्प कार्यालयाला सादर केला आहे.
वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. मात्र, स्वयंपाकघरातील अस्वच्छता, सडलेला भाजीपाला, परिसरातील घाणीचे साम्राज्य, माकडांचा किचनमध्ये प्रवेश आणि भोजन कंत्राटदाराकडे एफएसएसएआय नोंदणी नसल्याचे समोर येणे या बाबी गंभीर मानल्या जात आहेत.
या प्रकरणी केवळ कारणे दाखवा नोटीस बजावून न थांबता वसतिगृहातील भोजन व्यवस्था, स्वच्छता, भाजीपाला साठवणूक आणि कंत्राटदाराची पात्रता यांची नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना स्वच्छ व दर्जेदार भोजन मिळावे आणि त्यांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
आता अधीक्षकांकडून प्राप्त होणाऱ्या खुलाशानंतर प्रशासन कोणती पुढील कारवाई करते, तसेच वसतिगृहातील भोजन व स्वच्छता व्यवस्थेत कोणते बदल केले जातात, याकडे पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.




Petrol Price




