महत्वाच्या बातम्या

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना धमकी देणाऱ्या जयेशला न्यायालयीन कोठडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या कार्यालयात फोन करून धमकी देणाऱ्या कुख्यात आरोपी जयेश पुजारी ऊर्फ कांथा ऊर्फ साकीर साहिर याची रविवारी पोलिस कोठडी संपल्यावर धंतोली पोलिसांनी त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर केले. दरम्यान, सत्र न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. परंतु धंतोली पोलिस सोमवारी जयेशला दुसऱ्या गुन्ह्यासाठी सोमवारी प्रोडक्शन वॉरंट सादर करून ताब्यात घेणार असल्याची माहिती आहे.

कुख्यात आरोपी जयेशने पहिल्या प्रकरणात १३ जानेवारीला नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून १०० कोटींची मागणी करून घातपाताची धमकी दिली होती. त्याने हा फोन बेळगावच्या कारागृहातून केल्याचा खुलासा झाला होता. त्यावेळी जयेशला अटक करण्यासाठी गेलेले नागपूर पोलिसांचे पथक कायदेशीर अडचणींमुळे रिकाम्या हाताने परतले होते. परंतु, जयेशने पुन्हा कारागृहातून गडकरींच्या कार्यालयात फोन करून १० लाखांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे नागपूर पोलिसांनी त्यास बेळगावच्या कारागृहातून ताब्यात घेऊन विमानाने नागपुरात आणले होते. सत्र न्यायालयाने रविवारी २ एप्रिलपर्यंत त्यास पोलिस कोठडी दिली होती.

रविवारी त्याची पोलिस कोठडी संपल्यामुळे धंतोली पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने जयेशला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. चौकशीत जयेश पोलिसांना धमकीचे फोन करण्याची विविध कारणे सांगून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. कधी कारागृहातून बाहेर पडण्यासाठी तर कधी आपल्याकडे लक्ष वेधण्यासाठी फोन केल्याचे तो सांगत आहे. जयेशची रविवारी न्यायालयीन कोठडीत रवानगी झाल्यानंतर सोमवारी जयेशला दुसऱ्यांदा केलेल्या धमकीच्या फोनच्या गुन्ह्यात प्रोडक्शन वॉरंटवर ताब्यात घेण्यात येणार असल्याची माहिती धंतोली पोलिसांनी दिली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos