एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठात महिला व बाल संरक्षणावर मार्गदर्शनपर व्याख्यान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : महिला व बालकांवरील अत्याचारांना आळा घालणे, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करणे तसेच संकटाच्या काळात उपलब्ध असलेल्या शासकीय मदत व संरक्षण यंत्रणांची माहिती विद्यार्थिनींना व्हावी, या उद्देशाने एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई संचालित महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल, आजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग, बल्लारपूर येथे महिला व बाल संरक्षण तसेच सखी वन स्टॉप सेंटर या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. १५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमातून सशक्त महिला सुरक्षित समाज आणि सुरक्षित बालपण सशक्त भविष्य हा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्याच्या महिला व बाल विकास अधिकारी मीनाक्षी भस्मे यांच्या आदेशानुसार सखी वन स्टॉप सेंटरच्या केस वर्कर राणी अरुणराव खडसे आणि महिला सक्षमीकरण केंद्र, चंद्रपूरच्या डाटा एन्ट्री ऑपरेटर पापीहा महाकाळकर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून विद्यार्थिनी व शिक्षकांना विविध कायदेशीर आणि सामाजिक विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.
यावेळी बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठी असलेल्या पोक्सो कायदा २०१२ ची माहिती देण्यात आली. तसेच संकटात सापडलेल्या बालकांना मदत मिळवून देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन कशा प्रकारे कार्य करते, याबाबत विद्यार्थिनींना जागरूक करण्यात आले. सखी वन स्टॉप सेंटरच्या माध्यमातून पीडित महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय मदत, कायदेशीर सहाय्य आणि समुपदेशन यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, याची माहितीही देण्यात आली.
बाल संरक्षण कक्ष योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांवरही प्रकाश टाकण्यात आला. वाढत्या वयानुसार मुलांमध्ये होणारे शारीरिक व मानसिक बदल, या काळात पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधण्याचे महत्त्व आणि मुलांच्या समस्या समजून घेण्याची गरज याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच कौटुंबिक हिंसाचार, पीडित महिला व मुलींचे समुपदेशन तसेच १८ वर्षांखालील मुलामुलींच्या प्रेमप्रकरणांशी संबंधित संभाव्य धोके आणि कायदेशीर बाबी यांची माहिती देण्यात आली.
महिला व बालकांच्या सुरक्षिततेसाठी कायद्यांची माहिती असणे, संकटाच्या वेळी योग्य मदत घेणे आणि अन्यायाविरोधात आवाज उठविण्याचे धैर्य निर्माण करणे आवश्यक असल्याचे या मार्गदर्शनातून अधोरेखित करण्यात आले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थिनींमध्ये कायदेविषयक जागरूकता वाढण्यासोबतच महिला व बाल संरक्षणाच्या विविध यंत्रणांची माहिती मिळण्यास मदत होते.
हा कार्यक्रम विद्यापीठाचे संचालक डॉ. राजेश पी. इंगोले, उपकुलसचिव डॉ. बाळू राठोड आणि समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. आजीवन अध्ययन आणि विस्तार विभागाच्या श्रद्धा किनके यांनी कार्यक्रमाचे यशस्वी संयोजन केले. विद्यापीठाच्या सी-विंगमध्ये दुपारी ३ ते ४ या वेळेत पार पडलेल्या या व्याख्यानाला विद्यार्थिनी व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.




Petrol Price




