महत्वाच्या बातम्या

 पोळ्याच्या पार्श्वभूमीवर ब्रम्हपुरीत विनापरवाना भरमार बंदूक घेऊन फिरणारा जेरबंद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  चंद्रपूर : पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांकडून गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू असतानाच विनापरवाना भरमार बंदूक घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला ब्रम्हपुरी पोलिसांनी जेरबंद केले. मेंडकी ते गणेशपूर मार्गावरील स्मशानभूमीजवळ रात्रीच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून सुमारे १२ हजार रुपये किमतीची भरमार बंदूक जप्त करण्यात आली.

गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगदरम्यान एक इसम अवैधरित्या अग्निशस्त्र घेऊन मेंडकी ते गणेशपूर मार्गाने पायी जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपले नाव अंबरसिंग बच्चनसिंग दुधानी ४० वर्षे रा. रूपाळामेंढा/आकापूर, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर असे सांगितले.

झडतीदरम्यान त्याच्याकडे लाकडी बनावटीची भरमार बंदूक आढळून आली. सदर अग्निशस्त्र बाळगण्याचा परवाना आहे का, अशी विचारणा केली असता आरोपीकडे कोणताही परवाना नसल्याचे समोर आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून भरमार बंदूक जप्त केली.

पोळा तसेच आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात असताना ही कारवाई करण्यात आली. विनापरवाना अग्निशस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा १९५९ मधील कलम ३ व २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई ब्रम्हपुरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रमोद बानबले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रेखलाल गौतम, पोहवा रतन लेनगुरे, शरद सावसाकडे, पोअं अमोल लोनबले, अभिषेक आगाशे, शुभम लेडांगे यांनी केले.





  Print






Related Photos