महत्वाच्या बातम्या

 गुलाबी बोंडअळीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना एसएमएस गावदवंडी फ्लॅश कार्डच्या माध्यमातून जनजागृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधि / चंद्रपुर : जिल्ह्यात कापुस पिकाचे क्षेत्र १ लक्ष ६० हजार ६०९ हेक्टर असून २०२२ ते २३ या वर्षात १ लक्ष ७४ हजार ९६२ क्षेत्रावर कपाशीची पेरणी झाली आहे. सद्यस्थितीत कापूस पीक बोंड अवस्थेत आहे. तसेच कापूस वेचायला प्रारंभ झाला आहे. मात्र गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावाची शक्यता लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कृषी विभागामार्फत शेतक-यांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. याच अनुषंगाने एम किसान पोर्टलवरून जिल्ह्यातील १ लक्ष २८ हजार २६५ शेतक-यांना कापूस पिकाचे १५ एसएमएस पाठविण्यात आले आहे.
जिल्ह्यात कपाशीची सर्वाधिक पेरणी वरोरा तालुक्यात २३०९० हेक्टरवर झाली आहे. यानंतर कोरपना (२६४९२ हेक्टर), राजूरा (२५८२४ हेक्टर), चिमूर (२४४५४ हेक्टर), भद्रावती (१६६०८ हेक्टर), गोंडपिपरी (१५९४२ हेक्टर), जिवती (१२३४४ हेक्टर), चंद्रपूर (९८२५ हेक्टर), पोंभुर्णा (५५१९ हेक्टर), बल्लारपूर (३४८३ हेक्टर), मूल (१५४३ हेक्टर), सावली (७११ हेक्टर), ब्रम्हपूरी (६७ हेक्टर), सिंदेवाही (३७ हेक्टर) आणि नागभीड तालुक्यात (२४ हेक्टर) अशी एकूण १ लक्ष ७४ हजार ९६२ हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे.
सद्यस्थितीत कपाशीला बोंडे आली असून गुलाबी बोंडअळी नियंत्रणासाठी कृषी विभागामार्फत उपाययोजना राबविण्यात येत आहे. यात १ लक्ष २८ हजार २६५ शेतक-यांना एसएमएस पाठविण्यासोबतच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कापूस विकास कार्यक्रमांतर्गत ८२०० फेरोमेन ट्रॅप व १६०२२ ल्युर्सचे शेतक-यांना वाटप करण्यात आले आहे. याशिवाय क्रॉपसॅप अंतर्गत कापूस पीक लागवड करीत असलेल्या तालुक्यांमध्ये २८० निश्चित प्लॉटकरीता ११२० फेरोमेन ट्रॅप व ३३६० ल्युर्सचे वाटप, गुलाबी बोंडअळी एकात्मिक व्यवस्थापनासाठी कापूस पिकाचे १६० फ्लॅशकार्ड तयार करण्यात आले असून कापूस पिकाच्या क्षेत्रातील कृषी सहाय्यकांना देण्यात आले आहे. क्रॉपसॅप योजनेंतर्गत आपत्कालीन परिस्थितीकरीता १५०.५ लीटर इमामेक्टीन बेन्झोएट या रासायनिक किटकनाशकांचा पुरवठा करण्यात आला आहे.
क्रॉपसॅप अंतर्गत जिल्ह्यातील क्षेत्रीय स्तरावरील २२१ कृषी सहाय्यकाद्वारे १४५०४ व ५० कृषी पर्यवेक्षकांद्वारे ३२०० पीकनिहाय सर्वेक्षण करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यामार्फत २५५६ गाव बैठकासुध्दा घेण्यात आले. गुलाबी बोंडअळी निर्मुलनाकरीता १३७ गावांमध्ये दवंडी देण्यात आल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ब-हाटे यांनी दिली.
गुलाबी बोंडअळीचे योग्य व्यवस्थापन करण्याचे शेतक-यांना आवाहन 
कपाशीचे फरदळ घेण्याचे टाळावे. हंगाम संपल्यानंतर लगेच शेतात जनावरे किंवा शेळ्या, मेंढ्या चरण्यासाठी सोडाव्यात. शेतातील पिकांचे अवशेष वेचून जाळून टाकावे व पुढील हंगामाअगोदर सर्व पऱ्हाटीचा नायनाट करावा. आंबाडी, भेंडी, मुद्रिका अशी पिके कपाशीपुर्वी किंवा नंतर घेऊ नयेत व पिकांची फेरपालट करावी. कपाशी पिकात आश्रय ओळी लावाव्यात. पिकांचे नियमित सर्वेक्षण करावे. गुलाबी बोंडळीसाठी हेक्टरी किमान पाच कामगंध सापळे वापरावे. प्रादुर्भावग्रस्त गळालेली पाते व बोंडे जमा करून नष्ट करावे. डोमकळ्या दिसून आल्यास त्या तोडून आतील अळीसह नष्ट करावे. कपाशीचे पीक १२० ते १३० दिवसाचे झाल्यावर ट्रायकोग्रामा बॅक्ट्री या परोपजीवी गांधीलमाशीचे कार्ड कपाशीत लावावेत. गुलाबी बोंडअळी ही बोंडामध्ये असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही, त्यामुळे नियमित सर्वेक्षण करून एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos