महत्वाच्या बातम्या

 शालार्थ आयडी घोटाळ्यात यवतमाळ शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर अटक


- पोलिसांची आणखी मोठी कारवाई, १२ कोटींची फसवणूक, २७ आरोपी अटकेत

विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात पोलिसांनी आणखी एक मोठी कारवाई करत यवतमाळ येथील शिक्षणाधिकारी रविंद्र काटोलकर यांना अटक केली आहे. नागपुरात प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना त्यांनी बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा ठपका आहे. काटोलकर यांना वर्धा येथून अटक करण्यात आली असून, या प्रकरणाची चर्चा शिक्षण विभागात रंगली आहे.

ऑनलाइन शालार्थ आयडी प्रणालीचा दुरुपयोग करून अनेक शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बोगस भरती करण्यात आली. यावर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी रविंद्र ज्ञानेश्वर पाटील यांच्या तक्रारीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास राज्यस्तरीय विशेष तपास पथक करीत आहे.

काटोलकर हे २०२१ मध्ये नागपुरात प्राथमिक शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाले होते आणि २०२२ मध्ये जिल्हा परिषदेत असताना त्यांना शालार्थ आयडीसंबंधी बनावट माहिती मिळाली होती. मात्र त्यांनं शहानिशा न करता थकीत वेतन देण्याची प्रक्रिया सुरू केली, ज्यामुळे शासनाची १२ कोटी रुपये फसवणूक झाली. मंगळवारी पोलिसांनी वर्ध्यातून त्यांना ताब्यात घेतले आणि २५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

शालार्थ आयडी घोटाळ्यातील अटकेतील आरोपींची संख्या २७ झाली आहे. यामध्ये तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, सहायक शिक्षक, सहा लिपीक व कनिष्ठ लिपीकांचा समावेश आहे.

तपास सुरू : सायबर पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू ठेवला असून, आणखी अटकांची शक्यता वर्तवली जात आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos