महत्वाच्या बातम्या

 दिभना-अमिर्झा मार्गावर रानटी हत्तींचे ठाण : प्रवाशांमध्ये दहशत


- सायंकाळनंतर मुख्य रस्त्यालगत मुक्तसंचार; दोन दिवसांत धान पिकाची मोठी नासधूस, शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधि / गडचिरोली : दिभना-अमिर्झा मार्गावर मागील दोन दिवसांपासून रानटी हत्तींच्या कळपाचा मुक्तसंचार सुरू असल्याने या मार्गाने प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायंकाळी ५ वाजेनंतर हत्तींचा कळप रस्त्यालगत तसेच मुख्य मार्गावर येत असल्याने या मार्गावरून रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोकादायक ठरत आहे. मंगळवारी हत्तींचा कळप दिभना परिसरातील शेतशिवारात दिसून आल्याने नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

रस्त्यालगतच हत्तींचा वावर -
दिभना-अमिर्झा मार्ग परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र असल्याने या भागात वन्यप्राण्यांचा वावर असतो. मात्र गेल्या दोन दिवसांपासून रानटी हत्तींचा कळप थेट मुख्य रस्त्यालगत येत असल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे. सायंकाळी पाच वाजल्यानंतर हत्ती रस्त्याच्या परिसरात येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे. हत्तींचा कळप रस्त्यालगत दिसताच अनेक प्रवासी वाहने थांबवून हत्ती पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे एकीकडे हत्तींच्या उपस्थितीमुळे धोका निर्माण झाला असतानाच दुसरीकडे त्यांना पाहण्यासाठी होणारी गर्दीही धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. हत्ती अचानक आक्रमक झाल्यास किंवा रस्त्यावर धाव घेतल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.

उभ्या धान पिकाची नासधूस -
रानटी हत्तींच्या कळपाने सोमवार आणि मंगळवारी दिभना परिसरातील शेतशिवारात प्रवेश करून शेतकऱ्यांच्या उभ्या धान पिकाची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. हत्तींच्या कळपाने शेतात घुसून धान तुडवल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच विविध नैसर्गिक संकटे, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीतील अनिश्चिततेमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता रानटी हत्तींच्या उपद्रवाचे नवे संकट उभे ठाकले आहे. हाताशी आलेले पीक हत्तींच्या कळपामुळे उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

हत्ती पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी -
मंगळवारी दिभना परिसरातील शेतशिवारात हत्तींचा कळप दिसून आला. हत्तींची माहिती परिसरात पसरताच त्यांना पाहण्यासाठी ये-जा करणाऱ्या प्रवाशांसह स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली. वन्यप्राण्यांना जवळून पाहण्याच्या उत्सुकतेतून नागरिक हत्तींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करीत असल्यास ही बाब अधिक धोकादायक ठरू शकते. हत्तींच्या कळपापासून नागरिकांनी सुरक्षित अंतर राखावे आणि त्यांना त्रास होईल अशा प्रकारे गर्दी करू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दोन वनविभागांचा संयुक्त बंदोबस्त गरजेचा -
दिभना-अमिर्झा परिसर हा वन्यजीवांच्या दृष्टीने समृद्ध भाग असून, या परिसराचा संबंध वडसा वनविभागांतर्गत पोर्ला वनपरिक्षेत्र, एफडीसीएमचा परिसर तसेच गडचिरोली वनविभागातील चातगाव वनपरिक्षेत्राच्या अमिर्झा उपवनक्षेत्राशी येतो. दिभना-अमिर्झा हा मुख्य रस्ता या विस्तीर्ण वनक्षेत्रातून जात असल्याने वनक्षेत्राचे दोन वेगवेगळ्या वनविभागांच्या कार्यक्षेत्रात विभाजन झाले आहे. त्यामुळे हत्तींच्या कळपाचा वावर एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात होत असल्यास त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन्ही वनविभागांमध्ये समन्वय असणे आवश्यक आहे.

संयुक्त गस्त वाढविण्याची मागणी -
हत्तींचा कळप वारंवार मुख्य रस्त्यावर येत असल्याने वडसा आणि गडचिरोली वनविभागाने तातडीने संयुक्त गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांकडून केली जात आहे. विशेषतः सायंकाळी पाच वाजल्यानंतर या मार्गावर वनकर्मचाऱ्यांची उपस्थिती वाढवून प्रवाशांना सावध करणे गरजेचे आहे. तसेच हत्तींच्या कळपामुळे नुकसान झालेल्या शेतांची तातडीने पाहणी करून पंचनामे करावेत आणि बाधित शेतकऱ्यांना नियमानुसार नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. हत्तींच्या मुक्तसंचारामुळे सध्या दिभना-अमिर्झा मार्गावरील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे वनविभागाने परिस्थिती गांभीर्याने घेत तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





  Print






Related Photos