महत्वाच्या बातम्या

 KVR कंपनीत खंडणीचा दबाव : मॅनेजरला मारहाण करून ५० हजारांची मागणी, तिघे अटकेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : कंपनी चालवायची असेल तर दरमहा ५० हजार रुपये द्या, पैसे दिले नाही तर जीवे मारू, अशा धमकीने वरवट येथील KVR कंपनीतील मॅनेजर हादरल्याची घटना समोर आली आहे. कंपनीत घुसून मॅनेजरला मारहाण करीत खंडणीची मागणी केल्याप्रकरणी दुर्गापूर पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. अजय कुचनकर, सुमित रामटेके आणि पवन जाधव अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

७ ऑक्टोबर रोजी तिघे आरोपी KVR कंपनीत गेले. यावेळी त्यांनी कंपनीचे मॅनेजर साईप्रकाश गाजुला यांच्याकडे दरमहा ५० हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्यांना मारहाण केल्याचे पोलिसांत दाखल तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

घटनेची माहिती मिळताच दुर्गापूर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०८(४), ३०८(५), ११५(२), ३३३ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेले आरोपी राजकीय पक्षाशी संबंधित कार्यकर्ते असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ते नेमक्या कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित आहेत, याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.

कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. व्यवसाय चालविण्यासाठी खंडणीचा दबाव आणि विरोध केल्यास जीवे मारण्याची धमकी या प्रकारामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास दुर्गापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार संतोष शेगावकर करीत आहे.





  Print






Related Photos