महत्वाच्या बातम्या

 २७ नोव्हेंबरला वनामती  येथे विशेष युवा संगीत सभेचे आयोजन


- शास्त्रीय संगीतापासून फ्युजनपर्यंत युवा प्रतिभेचा सुरेल आविष्कार

- युवा कलागुणांना मिळणार आकाशवाणीचे भव्य व्यासपीठ!

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नवोदित आणि युवा कलाकारांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांना आपली कला सादर करण्याची हक्काची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आकाशवाणी नागपूर केंद्राच्या वतीने एअर रॉयझिंग स्टॉर- सेशन १ (२०२६)  या विशेष उपक्रमांतर्गत भव्य युवा संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरमपेठ, नागपूर येथील वनामती सभागृह  येथे हा संगीत सोहळा रंगणार आहे.

युवा पिढीतील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, नव्या कलाकारांना रसिकांसमोर आपली कला सादर करण्याची संधी मिळावी आणि भारतीय संगीताच्या समृद्ध परंपरेचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या उद्देशाने आकाशवाणी नागपूरने हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या संगीत सभेच्या माध्यमातून शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत, मराठी भावगीत आणि आधुनिक संगीताचा सुरेल संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.

या कार्यक्रमात नवोदित युवा गायक आनंद चिमोटे हे शास्त्रीय गायन सादर करणार आहेत. तर ऋषिकेश करमरकर यांच्या दिलरुबा वादनातून भारतीय अभिजात वाद्यसंगीताची मधुर अनुभूती रसिकांना मिळणार आहे. सुगम संगीताच्या क्षेत्रातील तेजस्विनी खोडतकर या आपल्या सुरेल आवाजात मराठी भावगीतांची मेजवानी सादर करणार आहेत.

कार्यक्रमाचे आणखी एक प्रमुख आकर्षण युवा कलाकार शुभम चोपकर  आणि संकेत माकोडे तसेच वाद्यवृंद यांच्या  बांसुरीवाला कलेक्टिव्ह म्युझिकल बँड  च्या माध्यमातून फ्युजन संगीताचा अनोखा आविष्कार असणार आहे. पारंपरिक भारतीय संगीत आणि आधुनिक संगीतशैली यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून अनुभवायला मिळणार आहे.

या संगीत सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षा शिवानी दाणी-वखरे तसेच सुप्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ आणि जीवनकौशल्य प्रशिक्षक डॉ. संजय रघटाटे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. बदलत्या काळानुसार नव्या पिढीतील कलाकारांना प्रोत्साहन देत त्यांच्या कलेला व्यापक श्रोतेवर्गापर्यंत पोहोचविण्याचा आकाशवाणी नागपूरचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे. एअर रॉयझिंग स्टॉर- सेशन १ हा उपक्रम युवा कलाकारांच्या कलाप्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा आहे.

विशेष म्हणजे, हा संपूर्ण कार्यक्रम आकाशवाणी नागपूर केंद्राच्या वतीने रसिकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात आला आहे. नागपूरकर संगीतप्रेमी, कलारसिक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून युवा कलाकारांच्या सादरीकरणाचा आनंद घ्यावा आणि त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आकाशवाणी नागपूर केंद्राचे  कार्यक्रम प्रमुख डॉ.विजयसिंह राजपूत यांनी केले आहे. या संगीत सभेचे संपादित ध्वनिमुद्रण मंगळवार, १ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता आकाशवाणी नागपूरच्या अ केंद्रावरून प्रसारित करण्यात येणार आहे.





  Print






Related Photos