महत्वाच्या बातम्या

 एमआयडीसी विरोधातील आंदोलनाची अखेर सांगता


- मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल; शेतकऱ्यांची दिवाळी जाणार आनंदात 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी : तालुक्यात प्रस्तावित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) प्रस्तावित प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात आष्टी येथे सुरू असलेल्या आंदोलनाची अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली. मंगळवारी ३ रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध पालकर यांनी आंदोलकांची समजूत घालत यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन समाप्त झाले. भर पावसातही  सुरू असलेल्या या आंदोलनाला समाप्त करण्यात करण्यात आमदार डाॅ. मिलिंद नरोटे, जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, पोलिस अधीक्षक एम. रमेश यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले.

चामोर्शी तालुक्यात प्रस्तावित एमआयडीसी प्रकल्पासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाविरोधात शेतकरी आणि ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी या आंदोलनाची दखल घेटली. मुख्यमंत्रांचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध पालकर यानी आंदोलनाला भेट देत आंदोलकांशी चर्चा केली. यावेळी आंदोलकांना संबोधित करताना अनिरूद्ध पालकर म्हणाले की, मागील दोन -तीन दिवसांपासून तुम्ही उपोषणाला बसलेआहात, आंदोलन करत आहात. तुमच्या अधिकारासाठी तुम्ही हे आंदोलन करत आहात. मुख्यमंत्र्यांनी आता या आंदोलनाची दखल घेतली आहे. 

आम्ही पोलिस विभाग व आंदोलक नेत्यांशी चर्चा केली. या प्रस्तावित प्रकल्पासाठी जमिन अधिग्रहण करताना सरकार कोणताही अन्याय करणार नाही. यापूर्वी जी नोटीस देण्यात आली. त्याचा कालावधी संपला आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी आपली जमीन बळजबरीने घेतली जाईल ही भिती मनातून काढून टाकावी. सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितासाठीच कार्यरत आहे, असेही ते म्हणाले. अनिरूद्ध पालकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आंदोलकांनी त्यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल समाधान व्यक्त करत आंदोलन समाप्त केले. 

यावेळी चित्तरंजनपूर-दुर्गापूर येथील आशीष मिस्त्री म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी पालकर यांनी जे सांगितले त्याच्याशी आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. या आंदोलनाला शेतकरी, ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद मिळाला, लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे या आंदोलनात आम्ही महिलांना नेतृत्व दिले. महिलांनीही अतिशय आत्मविश्वासाने चर्चा केली व मुख्यमंत्र्यांच्या प्रतिनिधींपुढे शेतकरी, ग्रामस्थांच्या अडचणी मांडल्या. त्याबद्दल आम्ही   त्यांचेही आभार व्यक्त करतो. 

आष्टीतील एमआयडीसी जमीन अधिग्रहणविरोधात सोमवारी २ दुपारी ३ वाजता आष्टी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच होते. आमची जमीन वाचवा, एमआयडीसी हटवा! या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कोणत्याही परिस्थितीत जमीन अधिग्रहण होऊ देणार नाही, असा निर्धार शेतकऱ्यांनी केला. आंदोलनादरम्यान पावसाने हजेरी लावली होती. मात्र शेतकऱ्यांच्या आंदोलनाची धग कमी झाली नाही. अनेक शेतकरी भर पावसातही रस्त्यावर ठाण मांडून बसले होते. 

शेती ही केवळ जमिनीचा तुकडा नसून पिढ्यान्‌पिढ्यांच्या कष्टांची शिदोरी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार आहे. अशा जमिनी एमआयडीसीच्या नावाखाली हिरावून घेण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतली होती. दरम्यान आमदार डाॅ. मिलिंद नरोटे आंदोलन स्थळी भेट देत आंदोलकांशी चर्चा केली होती.

त्यामुळे आंदोलक काही प्रमाणात शांत झाले तरी आंदोलन संपवायला तयार झाले नव्हते. जिल्हाधिकारी पंडा, पोलिस अधीक्षक एम. रमेश आंदोलकांशी सातत्याने संपर्क साधून पाठपुरावा करत होते. अखेर मुख्यमंत्र्यांनी या आंदोलनाची दखल घेत त्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध पालकर यांना आंदोलन स्थळी पाठवले. पालकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या वतीने आंदोलकांसी संवाद साधत त्यांना आश्वस्त केले. या यशस्वी मध्यस्थीनंतर अखेर उग्र रूप धारण करण्याची शक्यता असलेल्या या आंदोलनाची सांगता झाली.

वाहतूक व्यवस्थेला फटका -
आंदोलकांच्या आंबेडकर चौकातील रास्ता रोकोमुळे आष्टी परिसरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवासी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अनिरूद्ध पालकर यांनी यशस्वी मध्यस्थी केल्यामुळे हे आंदोलन समाप्त झाल्याने सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.





  Print






Related Photos