महात्मा फुले महामंडळाच्या कर्ज योजनांच्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण होणार योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन होणार


- व्यवसाय, रोजगार व उत्पन्नवाढीची माहिती संकलित करणार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांचे सर्वेक्षण आणि योजनांच्या परिणामांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पायलट प्रकल्प राबविण्यात येणार असून लाभार्थ्यांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.
मागासवर्गीय समाजातील घटकांचे सामाजिक व आर्थिक उत्थान करणे, त्यांना स्वयंरोजगार व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा महामंडळाचा प्रमुख उद्देश आहे. या उद्देशाने महामंडळामार्फत विविध कर्ज व आर्थिक सहाय्य योजना राबविण्यात येतात. या सर्वेक्षणासाठी मे. प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कन्सल्टंट्स प्रा. लि. या संस्थेची तांत्रिक सहाय्य संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वेक्षणादरम्यान कर्ज योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संपर्क साधून कर्जाचा वापर कोणत्या व्यवसायासाठी करण्यात आला, संबंधित व्यवसायाची सद्यस्थिती काय आहे, रोजगार व उत्पन्नामध्ये किती वाढ झाली, तसेच कर्ज परतफेडीची स्थिती काय आहे, याची माहिती संकलित करण्यात येणार आहे.
याशिवाय कर्ज वितरणानंतर व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणी, व्यवसायाची प्रगती आणि योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटींचाही अभ्यास केला जाणार आहे. या सर्वेक्षणासाठी महामंडळाच्या नियुक्त प्रतिनिधींना लाभार्थ्यांनी आवश्यक माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे. सर्वेक्षणातून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे महामंडळाच्या योजनांची परिणामकारकता वाढविणे, भविष्यातील योजनांचे अधिक प्रभावी नियोजन करणे आणि लाभार्थ्यांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.




Petrol Price




