दुर्गम भागातही पोरेड्डीवारांनी जिवंत ठेवले सहकार क्षेत्र : अभिनेता भारत गणेशपूरे यांचे गौरवोद्गार


- जिल्हा मध्यवर्ती बॅंकेत मोबाईल बॅकिंगची सुविधा सुरु
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक संचालक मंडळाच्या मेहनतीने उभी आहे. राज्यात सहकार क्षेत्राचा सगळीकडे स्वाहाकार सुरु असतांना गडचिरोलीसारख्या आदिवासी, दुर्गम क्षेत्रातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला प्रगतीच्या उच्च शिखरावर पोहचवून पोरेड्डीवार कुटूंबियांनी सहकार क्षेत्र जिवंत ठेवल्याचे गौरोद्गार सुप्रसिद्ध मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी काढले.
 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेद्वारा मोबाईल बॅंकींग, एम पासबुक आणि मायक्रो एटीएम सेवा केंद्राच्या उद्घाटनाप्रसंगी ते उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित सावकार पोरेड्डीवार उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आ. कृष्णा गजबे, बॅंकेचे उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, संचालक खुशाल वाघरे, मानद सचिव अनंत साळवे, बॅंकेचे मुख्याधिकारी सतीश आयलवार, मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर आदी उपस्थित होते.
 पुढे बोलतांना भारत गणेशपुरे म्हणाले की, सहकार नाव घेतल्याबरोबर अनेकांच्या भुवया उंचावितात. सगळीकडे सहकार क्षेत्र डबघाईस आलेला दिसतो. अशा परिस्थितीत गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची यशस्वी वाटचाल सहकार क्षेत्राला ऊर्जा देणारी आहे. बॅंकेचे तरुण संचालक मंडळ बॅंकेच्या प्रगतीमध्ये हातभार लावित आहेत. या बॅंकेने २ हजार करोड रुपयाचा व्यवसाय करुन भविष्यात अडीच हजार करोड रुपयापर्यंत नेण्याचा त्यांचा मानस आहे. यासाठी बॅंकेनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन ग्राहकांना सुलभ सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. बॅंकींग क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर महत्वाचा ठरला आहे. युवा पिढींनी या तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बॅकींग सेवा आता पूर्णपणे सुरक्षित असून प्रत्येकांनी मोबाईल बॅंकींगचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे. बॅंकेच्या कार्याची प्रशंसा करतांना या बॅंकेने विविध पुरस्कार प्रापत करुन स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुर्गम क्षेत्रात या बॅंकेचे जाळे पसरले असून नागरिकांना याचा लाभ मिळत आहे. मोबाईल बॅंकींगची सुविधा उपलब्ध झाल्याने नागरिकांना याचा मोठा लाभ होईल, अशी आशाही गणेशपुरे यांनी व्यक्त केली.
 यावेळी मार्गदर्शन करतांना बॅंकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले की, मोबाईलद्वारे जग आता हातात सामावलेले आहे. त्यामुळे मोबाईल बंद पडला तर माणूस बंद पडला, अशी अवस्था झाली आहे. मोठा विचार करणे, मोठ्या कामाची सुरुवात असते. मोबाईल बॅकींग सुविधेच्या माध्यमातून जिल्हा बॅंकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा मार्ग ग्राहकांसाठी खुला केला आहे. या सुविधेचा तरुण पिढींनी लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा बॅंक सामान्य माणसाचे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. बॅंकेने आजपर्यंत सामान्य माणसाचे नेतृत्व करीतच आपला प्रवास सुरु ठेवला आहे. बॅंकेने नेहमी ग्राहकांना दर्जेदार सोयीसुविधा देण्यावर भर दिला आहे. लोकांच्या विश्वासार्हतेवरच बॅंकेने यशाचे शिखर गाठले आहे. बॅंकेच्या ५२ शाखांच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुर्गम भागात सेवा दिली जात आहे. विदर्भाचा मान उभ्या महाराष्ट्रात उंचाविणारे मराठी अभिनेते भारत गणेशपुरे यांची प्रशंसाही प्रंचित पोरेड्डीवार यांनी केली. गणेशपुरे यांच्या हस्ते मोबाईल बॅँकींगचे उद्घाटन केल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.
 यावेळी आ. कृष्णा गजबे यांनी जिल्हा बॅंक ही येथील लोकांसाठी आपली बॅंक बनली आहे. या बॅंकेच्या प्रगतीचा आलेख चढता असून बॅंकेने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन इतर बॅंकेच्या तुलनेत आपण कुठेही कमी नाही, हे दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील सर्व शाखा नेट वर्किंगद्वारा जोडण्यात आल्या असून बॅंकेने सर्व दृष्टीने आपली छाप सोडली असल्याचे गौरोद्गार आ. गजबे यांनी काढले. 
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार यांनी केले. संचालन प्रा. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर यांनी मानले. कार्यक्रमाला बॅंकेचे अधिकारी, सभासद, ग्राहक तसेच नागरीक उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2018-11-05


Related Photos