माहेरून पैसे न आणल्याने पत्नीची गळा चिरून हत्या : आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / बीड  :
माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्याच्या मागणीसाठी पत्नीचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी पतीला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्या. बी. व्ही. वाघ यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भरत पवार असे आरोपीचे नाव असून सदर घटना गेवराई तालुक्यातील जातेगावमध्ये  घडली होती.
माजलगाव तालुक्यातील जामगा तांड्यावरील गोविंद राठोड यांची मुलगी कविताचा गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील भरत पवार याच्याशी सन २०१६ मध्ये विवाह झाला होता. विवाहानंतर सहाच महिन्यांत तिचा सासरच्या मंडळींकडून छळ सुरू झाला. माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी हा छळ करण्यात येत होता. याच कारणावरून २७ नोव्हेंबर २०१६ रोजी पती भरत पवार याने जातेगाव शिवारातील यमाई देवी शिवारात कविताचा गळा चिरला.
गंभीर अवस्थेत कविताला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. 
या प्रकरणी कविताचे वडील गोविंद राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती भरत पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक शिरीष हुंबे यांनी या प्रकरणी तपास करून दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले होते.  Print


News - Rajy | Posted : 2018-11-03


Related Photos