राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता सुरू करणार मालवाहतूक सेवा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई : 
राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आता मालवाहतूक सेवा सुरू करणार असून, गोदामांच्या व्यवसायातही उतरणार आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार एसटीकडून मालवाहतूक आणि गोदामांची सेवा लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली. 
एसटीचे उत्पन्न वाढवणे आणि त्याचबरोबर लोकांना सुविधा किफायतशीर दरात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कल्पक उपाययोजना राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वतंत्र वाहनांद्वारे माल वाहतूक करणे, विनावापर पडून असलेल्या जागांवर ३०१ गोदामांची निर्मिती करण्याबाबत सादरीकरण बैठकीत करण्यात आले. बैठकीस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल, महामंडळाचे अधिकारी अशोक फळणीकर, माधव काळे, संजय गांजवे, अमित पटजोशी, विवेककुमार, रोहित चतुर्वेदी आदी उपस्थित होते. महामंडळाने प्रवासी वाहतुकीबरोबरच माल वाहतूक करण्याबाबत कायद्यात तरतूद आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या मालवाहतुकीच्या तरतुदीचा आता वापर करण्याचा निर्णय रावते यांनी घेतला आहे. त्याआधारे रेल्वे मालवाहतुकीच्या धर्तीवर आता एसटीचीही माल वाहतूक सुरू करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. 
मालवाहतूक सेवेसाठी स्वतंत्र वाहने वापरण्यात येणार आहेत. सध्याच्या वापरातील प्रवासी वाहनांचे नऊ वर्षानंतर सर्व तांत्रिक बाबी पडताळून मालवाहतूक वाहनांमध्ये रूपांतर करण्यात येईल. त्यास परिवहन विभागाची मान्यता घेण्यात येईल. त्यानंतर ही वाहने माल वाहतुकीसाठी वापरण्यात येतील. महामंडळाच्या साधारण तीन हजार जुन्या प्रवासी बसेसचे माल वाहतूक वाहनांमध्ये रूपांतरण करण्यात येईल. काही नवीन मालवाहतूक वाहने खरेदी करण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. महामंडळाच्या नव्या सेवेत रेशन धान्य, पोषण आहाराचे धान्य आदींची वाहतूक करण्याचेही प्रस्तावित आहे. 

   Print


News - Rajy | Posted : 2019-01-07


Related Photos