स्त्रियांच्या लग्नाचे वय १८ ऐवजी २१ करण्याच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
स्त्रियांच्या विवाहाच्या वयाच्या निर्णयासंदर्भात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. अशी माहिती मिळते आहे की, देशात महिलांच्या लग्नाचे वय 18 ऐवजी आता वाढवून 21 वर्ष करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
बुधवारी कॅबिनेटच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. याकरिता सरकार सध्याच्या कायद्यात सुधारणा करण्याचे विधेयक आणणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात पहिल्यांदाच याचा उल्लेख केला होता. मुलींना कुपोषणापासून वाचवायचे असेल तर त्यांचे लग्न योग्य वेळी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले होते. सध्या पुरुषांसाठी विवाहाचे किमान वय 21 आणि महिलांचे 18 वर्षे आहे. आता सरकार बालविवाह प्रतिबंध कायदा, विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायद्यात सुधारणा करून त्याला एक स्वरूप देणार आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.
नीती आयोगातील जया जेटली यांच्या नेतृत्वाखालील टास्क फोर्सने याची शिफारस केली होती. व्हीके पॉल हे देखील या टास्क फोर्सचे सदस्य होते. याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण आणि साक्षरता अभियान आणि न्याय आणि कायदा मंत्रालयाचे विधेयक विभाग टास्क फोर्सचे सदस्य होते.
गेल्या वर्षी जूनमध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती आणि गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच त्याचा अहवाल दिला होता. टास्क फोर्सने सांगितले की, पहिल्या मुलाला जन्म देताना स्त्रीचे वय कमीत कमी 21 वर्षे असावे. लग्नाचे कमीत कमी वय वाढवल्याने कुटुंब, महिला, मुले आणि समाज यांच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो.  Print


News - Rajy | Posted : 2021-12-16
Related Photos