माजरी परिसरात रुबाबदार वाघिणीचा मृत्यू : वनविभागात खळबळ
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
शहर प्रतिनिधी / चंद्रपूर : माजरी (ता. भद्रावती) शेतशिवारात एका वाघिणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली.
शेतातील पिकांना जंगली प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी लावलेल्या बॅटरीद्वारे संचालित सोलर पॉवर सिस्टिमच्या विद्युत प्रवाहित तारांमध्ये ही वाघीण अडकली. माजरी गावापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या वरोरा-भद्रावती अप रेल्वे मार्गावर सी-कॅबिनच्या पोल क्र. सीएच-३२०/१५ जवळ असलेल्या देवराव पाटेकर यांच्या शेतात या वाघिणीचा मृत्यू झाला.
पाटेकर यांच्या शेतशिवारात रविवारी सकाळच्या सुमारास वाघिणीचा मृतदेह रेल्वे कर्मचाऱ्यांना दिसला. माजरी, चारगाव या परिसरात नरभक्षी म्हणून ओळखली जाणारी ही मोठी वाघीण होती. जवळपास सहा वर्षे इतके वय असलेली अंदाजे २०० किलोची रुबाबदार वाघीण होती. याप्रकरणी पुढील तपास विभागीय वन अधिकारी प्रशांत खाडे, क्षेत्रीय संचालक जितेंद्र रामगावकर, मुख्य वनसंरक्षक प्रकाश लोणकर, सहायक वनसंरक्षक निकिता चौरे, वनपरिक्षेत्र अधिकारी हरिदास शेंडे, क्षेत्र सहायक विकास शिंदे करीत आहे.
ज्या ठिकाणी वाघिणीचा मृतदेह आढळला, त्याठिकाणी जंगली प्राण्यांपासून शेतातील पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांकडून सोलर पॉवरद्वारे विद्युत प्रवाहांचे तार लावण्यात आले होते. सदर वाघीण त्या विद्युत प्रवाहित तारांच्या संपर्कात येऊन विजेच्या धक्का बसल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, वनविभागाने यात घातपाताचा संशय व्यक्त करीत त्या दिशेने तपास सुरू केला आहे. सदर वाघिणीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट केले नाही. वाघिणीचा मृतदेह पाहण्यासाठी माजरी व आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. दरम्यान, माजरीचे ठाणेदार अजितसिंग देवरे यांनी त्याठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता.
दिल्लीकडे जाणाऱ्या दक्षिण एक्स्प्रेसच्या लोको पायलटला चालत्या ट्रेनमधून रविवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास माजरी जंक्शनच्या सी कॅबिनच्या मागे चार वाघ वावरताना दिसून आले. लोको पायलटने याची सूचना तत्काळ रेल्वे प्रशासनाला दिली. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने सदर सूचना माजरी पोलिसांना दिली. सूचना मिळताच माजरी पोलिसांनी याची माहिती वनविभागाला दिली आणि घटनास्थळी दाखल होऊन वनविभागाचे पथक येईपर्यंत वाघिणीच्या मृतदेहाजवळ पोलीस बंदोबस्त ठेवला.
वाघिणीच्या मृत्यू प्रकरणात सध्या वनविभागाची टीम तपास करीत आहे. परंतु घटनेच्या ठिकाणी मृत वाघिणीच्या शरीराला तार गुंडाळलेला दिसून आला आहे. देवराव पाटेकर यांच्या शेतातील बॅटरीद्वारे संचालित जे सोलर पॉवर सिस्टम आहे, ती जप्त केलेली आहे. मात्र, त्या सोलर पॉवरमुळे वाघिणीचा मृत्यू होऊ शकते, असे आम्हाला प्राथमिकदृष्ट्या वाटत नाही. वाघिणीच्या उत्तरीय तपासणीचा अहवाल आल्यानंतरच वाघिणीचा मृत्यू नेमक्या कोणत्या कारणाने झाला हे स्पष्ट होईल.
- प्रशांत खाडे, विभागीय वन अधिकारी, वन विभाग चंद्रपूर
News - Chandrapur